चिखलीच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात बोगसगिरी! कधीही या अन् हजेरी रजिस्टरवर सह्या मारून शासनाचा पगार घ्या; एकाच दिवसांत मारल्या जात आठवड्याभराच्या सह्या

 
karyalay
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तक्रारींचा पाढा दिवसेंदिवस वाढत चाललाय. आता तर चक्क सरकारची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा लाइव्ह च्या पाहणीत समोर आलाय. काहींना तर कर्तव्याची जाणीव नसल्याचे चित्र आहे. कर्मचारी वेळेवर हजर राहतात का? दररोज येतात का हे पाहण्यासाठी व महिनाअखेर पगार पत्रक तयार करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरणाऱ्या हजेरी रजिस्टरचा खेळ मांडल्याचे चित्र आहे. काही कर्मचारी (साहेब) तर चक्क आठवड्यातून एकदा येत आठवड्याभराच्या सह्या मारतात अन महिनाअखेर शासनाची फसवणूक करून पूर्ण पगार लाटतात असेही समोर आले आहे.

  चिखली शहरातील नगर परिषदेच्या आवारात हे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सद्यस्थितीत या आरोग्य केंद्रात १२ शासकीय नोकरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सरकारकडून मिळणाऱ्या पगाराच्या मोबदल्यात जनतेची सेवा करणे अपेक्षित असताना इथल्या काहींचे लक्ष केवळ मेवा मिळवण्याकडेच असते का असा सवालही उपस्थित होतोय. अर्थात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच मनमानी कारभार वाढला आहे. तालुका आरोग्य अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात की त्यांना अंधारात ठेवून हा कार्यक्रम चालतो याकडेही वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

हजेरी रजिस्टर सांभाळण्याची तसेच  कर्मचाऱ्यांच्या सह्या व्यवस्थित होतात का? गैरहजर कोण हे पाहण्याची जबाबदारी कुणाची असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. हजर, गैरहजर कोण हे पाहण्याची जबाबदारी कुण्या एकाकडे दिली असेल तर आठ- पंधरा दिवसांच्या हजर असल्याच्या सह्या एकाच दिवशी होतातच कशा ? यात कुणाची मिलीभगत आहे याचीही तपासणी होणे गरजेचे आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या अन् सह्या मारून जा असा अजब फंडा वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी अवलंबला असल्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी याप्रकरणात कोणती भूमिका घेतात? दोषींवर कारवाई करतात का याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.