बक्कळ पगार, तरीही खायची हाव..! जिल्ह्यात ११ महिन्यांत ७ लाचखोरांना अटक

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. हे काम लवकर व्हावे म्हणून सर्वसामान्य नागरिक शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत असतात. याच सर्वसामान्यांचा फायदा घेत काही लाचखोर शासकीय कर्मचारी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करतात. या मागणीला अनेक जण बळीही पडतात, तर काही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पायरी चढतात. या तक्रारीनंतर एसीबीचे पथक पडताळणी करून संबंधितांवर कारवाई करते. असे जरी असले तरी आता लाचखोरांनी त्यांचा ट्रेंड बदलविला असून, ते आता खासगी व्यक्तींच्या माध्यमातून लाच स्वीकारत असल्याचे मागील काही कारवायांतून उघड झाले आहे. मात्र लाचखोर कितीही पटाईत असले तरी एसीबीच्या करड्या नजरेतून असे खाजगी व्यक्तीही सुटले नाहीत. सायबांच्या हाताखाली काम करणारे अशा खाजगी व्यक्तींनाही एसीबी ने कारवाईचा झटका दाखवला आहे.
खासगी व्यक्तीच्या नावे लाच मागाल तर...
आधी लाच स्वीकारणारा लोकसेवक हा पैसे घेताना रंगेहाथ पकडला जात असे. मात्र, काही जण स्वत: न स्वीकारता खासगी व्यक्तीच्या माध्यमातून लाचेची मागणी करतात आणि लाच स्वीकारतात. आधी अशा खासगी व्यक्तीवर कारवाईचे बंधन येत होते. मात्र, २६ जुलै २०१८ पासून कायद्यात दुरुस्ती करून आता लोकसेवकाच्या वतीने लाचेची मागणी करणाऱ्या खासगी व्यक्तीवरही एसीबी कारवाई करीत आहे.
तक्रारीवरून सत्यता पडताळणी केली जाते. यामध्ये तथ्यता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते. तर लोकसेवकांच्या वतीने खासगी व्यक्ती जरी लाच मागितली असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येते. -एस. एन. चौधरी, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा.