मोठी बातमी! बुलडाणा बसस्थानकात ३ दहशतवादी घुसले.. पोलिसांनी पकडले! पण...

शहरात दहशतवादी हल्ला झाला तर त्याचा सामना करण्याचा सराव पोलिसांना व्हावा, यासाठी राज्य सरकारने राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तालयांना आपापल्या हद्दीत मॉक ड्रिल (रंगीत तालीम) घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी बुलडाणा बस स्थानकात अचानक हे ड्रिल घेण्यात आले. परंतु, पोलिसांनी बस स्थानकाला गराडा घातल्यानंतर क्षणाधार्थ हे 'मॉक ड्रिल' असल्याची माहिती तिथल्या लोकांना कळाली. त्यामुळे या ड्रिलमधले गांभीर्यच निघून गेले. मॉक ड्रिल करताना बस स्थानकातील लोकांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र, लोक वाटेल तसे फिरत होते. पोलिसही त्यांना हटकत नव्हते. प्रत्यक्षातल्या हल्ल्यादरम्यान असे प्रकार झाले तर अनेकांना जीव गमवावे लागतील. हल्ला जरी खोटा असला तरी तो खरा असल्याचे समजून पोलिसांनी काम करणे अपेक्षित असते. मात्र, पोलीसही केवळ सरकारी आदेशाचे पालन करण्यासाठीच अशा पद्धतीचे ड्रिल करतात की काय, अशी शंका त्यानिमित्ताने उपस्थित झाली.
अनेकांसाठी तर हे 'मॉक ड्रिल' म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रमच झाला होता. अतिरेक्यांना पकडण्यासाठी पोलीस धडपडत असल्याचे शुटिंग अनेकजण मोबाइलवर करीत होते. बस स्थानकाची सिक्युरिटी किती पोकळ आहे, हेदेखील निष्पन्न झाले.ही मॉक ड्रिल एस.डी. पी.ओ सचिन कदम, ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी घेतली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गावंडे व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते.