लहान्या भावाने केला मोठ्याचा खून! आता भोगावे लागणार पाप..! जळगाव जामोद तालुक्यातील धक्कादायक घटना

 
5yth
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सख्या मोठ्या भावाचा लहान्या भावाने निर्दयी खून केल्याची घटना एप्रिल २०१७ मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे घडली होती. दरम्यान खून करणाऱ्या लहान्या भावाला आता त्याच्या कर्माची फळे भोगावी लागणार आहे. खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निलेश फुसे ( रा. सुनगाव, ता. जळगाव जामोद) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२८ एप्रिल २०१७ च्या पहाटे अडीच वाजता आरोपी निलेश फुसे हा त्याचा भाऊ रमेश फुसे याच्या शेतातील घरी गेला. जोरजोरात दरवाजा वाजवला ,शिवीगाळ केली मात्र रमेश फुसे याने व त्याच्या पत्नीने दरवाजा न उघडल्याने तो तिथून निघून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास शेतात निलेश ने रमेशच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रमेशचा उपचारादरम्यान मृत्यू . २७ मे रोजी मृतक रमेशची पत्नी अर्चना फुसे हिने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.


 सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने एकूण १३ साक्षीदार तपासले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मृतकाची पत्नी व लहान मुलीची साक्ष महत्वाची ठरली. खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. वैरागडे यांनी निलेश फुसे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.