अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर! खामगाव तालुक्यातील नागझरी खुर्द ची घटना..!
Wed, 3 Aug 2022

उदयनगर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील नागझरी खुर्द शिवारात घडली. गंभीर जखमी शेतकऱ्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार खामगाव तालुक्यातील नागझरी खुर्द येथील शेतकरी बाळू जटाळे (३५) हे शेतात काम करीत असताना दोन अस्वलांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरडाओरड करून त्यांनी कशीबशी अस्वलाच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. मात्र अस्वलाने चावा घेऊन ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना आधी उदयनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथून जिल्हा सामान्य रुग्णालय खामगाव व नंतर अकोला येथे हलविण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.