ड्राय डे साठी 'ओले' होण्याची ‘सोय’ करणाऱ्यांना दणका!चिखलीच्या ठाणेदार विलास पाटलांनी केली दारू कारवाईने बोहनी!

 
Daru

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रजासत्ताक दिनाला ड्राय डे असतो. त्यामुळे दारूची दुकाने, बीअर बार बंद असते. मात्र त्यापूर्वीच आपली ‘सोय’ करून ठेवणाऱ्यांची व अवैध दारू विक्रेत्यांची संख्या मोठी आहे.याकडे नव्यानेच पदभार घेतलेल्या चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी लक्ष वेधले. २५ जानेवारीला डीबी पथकाने वेगवेगळ्या ३ कारवाईत ७१२० रुपयांचा मुद्देमाल  जप्त करून तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गून्हा दाखल केला आहे.

ड्राय डे असला की, या  दिवसात दारूची दुकाने, बीअर बार असे सारे बंद असतात. त्यापूर्वीच आपली ‘सोय’ करून ठेवली जाते. दुप्पट भावाने दारू विकली जात असल्याने विक्रेते मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवतात. ज्यांना ड्राय डे ची आठवण राहात नाही अशी माणसे, मग या दिवशी जेथे मिळू शकते, असे सारे ‘तीरथ, बार बार’ वगैरे शोधत असतात.

ते आपली ओले होण्याची सोय कशीही करून घेतात. अवैध दारू विक्रेत्यांची यादिवशी चंगळ असते. दुप्पट भावाने दारू विक्री केली जाते. अशा अवैध दारू विक्रेत्यांवर चिखली पोलिसांनी ३ ठिकाणी छापा मारला. आरोपी धम्मपाल भगवान चव्हाण रा. भालगाव, शिवाजी विश्वनाथ शेळके रा. शिरपूर, मधुकर सदाशिव तायडे रा. सवणा यांच्याकडील एकूण ७१२० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला. ठाणेदार विलास पाटील यांचे नेतृत्वात निवृत्ती चेके, उमेश राजपूत,शिवानंद तांबेकर, रामेश्वर भांडेकर, राहुल पायघन,सुनील राजपूत, निलेश सावळे यांनी ही कारवाई केली.