BULDANA LIVE EXCLUSIVE जिल्हाभर पावसाचा धुमाकूळ! खामगाव तालुक्यात विज पडून दोन गुरांचा मृत्यू; सोयाबीन, कापूस पाण्यात! यंदा "या" कारणामुळे डिसेंबर पर्यंत धोकाच, हिवाळा नव्हे हिवसाळा..!

 
jgvj
बुलडाणा(टीम बुलडाणा लाइव्ह): जिल्ह्यांत यंदा परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हे वृत्त लिहीत असताना म्हणजेच १८ ऑक्टोबरच्या सकाळी सुद्धा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात रात्रीपासून कमी - अधिक प्रमाणात पावसाने जोर धरल्याने आज, १८ ऑक्टोबरची सकाळ शेतकऱ्यांसाठी वेदनादायीच ठरली.

 चिखली तालुक्यात रात्रीपासून पाऊस सुरू असल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले. या पावसाने शेतात सोंगणे बाकी असलेली सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान झाले. देऊळगाव राजा, सिंदखेडराजा तालुक्यात सुद्धा सकाळपासून रिपरिप सुरूच आहे. मेहकर , लोणार , जानेफळ या भागातही रात्रीपासून धो - धो पाऊस सुरू आहे. खामगाव तालुक्यात काल, पाऊस कोसळला. अंत्रज येथे वीज कोसळून दोन गुरांचा मृत्यू झाला. दरम्यान आज पहाटेपासून  तालुक्यात रिपरिप सुरू आहे. शेगाव तालुक्यात रात्री ११ पासून पाऊस सुरू आहे , संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी पाऊस बरसेल असे वातावरण असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.
    
 नांदुरा , मलकापूर, मोताळा तालुक्याला सुद्धा परतीच्या पावसाच्या झळा बसत आहेत. बुलडाणा शहर व तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर आहे. धाड, चांडोळ भागात पाऊसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे आज सकाळी बुलडाणा शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. जिल्हाभर  अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले आहे. सोयाबीन पाण्यात उभी आहे तर काही ठिकाणी मळणी यंत्र सुडीजवळ जातांना चिखलात फसत असल्याने काढणी लांबण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे, मदत या भानगडी सुरू असल्या तरी या तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही.

यंदा डिसेंबर पर्यंत धोकाच! हिवाळा नव्हे हिवसाळा..

 दरम्यान यंदा डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कमी अधिक प्रमाणात अधून मधून पाऊस बसण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस विदर्भाच्या बहुतांश भागातून गेलेला आहे, मात्र सध्याचा  पडत असलेला पाऊस हा "ला निना" प्रभाव असल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने सांगण्यात आले.

काय आहे  "ला - निना"..

 प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होऊन पश्चिमेकडील भागात हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात, त्यामुळे पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते यालाच "ला निना" असे म्हटल्या जाते.  ही परिस्थिती डिसेंबर पर्यंत राहण्याची शक्यता आहे.