व्यवसायिकांनो म्हणून कामावर प्रामाणिक नोकरच ठेवा..! खामगावात नोकराने मालकाला कसा चुना लावला ते एकदा वाचाच..!

 
khamgao
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  हो, ही बातमी वाचल्यानंतर नोकर प्रामाणिकच हवा असे तुम्हीही म्हणाला. खामगावच्या एका फळांच्या व्यापाऱ्याला त्याच्या नोकराने चांगलाच चुना लावल्याचे समोर आले. गल्ल्यात लाखांच्या वर रोकड ठेवून दुकानाची जबाबदारी नोकरावर सोपवणे  मालकाला चांगलेच महागात पडले. १ लाख १० हजार रुपये घेऊन नोकर थेट पुण्याला निघून गेला. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात अप्रामाणिक नोकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

खामगावच्या नितीन अर्जुन हिरडकार (३५) यांचे नोंदुरा रोडवर फ्रूट विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर शेख सईद शेख अजीज (३८, रा.शिवाजी वेस ,खामगाव) हा नोकर आहे. ३ जुलैला सकाळी दुकान उघडले तेव्हा मालक आणि नोकर दोघेही दुकानावर हजर होते. त्यावेळी व्यापाऱ्यांना देण्यासाठी बँकेतून आणलेले १ लाख १० हजार रुपये मालकाने गल्ल्यात ठेवले. त्यानंतर मालक माल खरेदी करण्यासाठी नितीन हिरडकार खामगावच्या टिळक मैदानातील बाजारात गेले. त्यावेळी नोकर शेख सईद दुकानावर होता. माल खरेदी केल्यानंतर मालक नितीन हिरडकार जेव्हा पुन्हा दुकानावर गेले तेव्हा तिथे नोकर शेख सईद दिसून आला नाही. 

  त्यांनी गल्ल्यात पाहिले असता ठेवलेली रक्कल गायब दिसली.  नोकराचा सगळीकडे शोध घेऊनही तो सापडला नाही. तेव्हा मालकाने नोकराचे घर गाठले. आमच्या मुलाकडून चूक झाली, तो पुण्याला गेलाय, तुमचे पैसे परत करायला सांगतो असे त्याच्या आईवडिलांना सांगितले. मात्र तब्बल २ महिने उलटून शेख सईद  खामगावात आला नाही, आणि मालकाला पैसे परत मिळाले नाही. अखेर वैतागून मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शेख सईद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.