वाद भोंग्यांचा ! खामगावात हनुमान मंदिराची साऊंड सिस्टीम जप्त; हिंदूच्या भावना दुखावल्याचा मनसेचा आरोप

 
steshanbuldana
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात भोंग्यावरून राजकारण पेटलेले असतांनाच त्याचे पडसाद आता जिल्ह्यातही उमटायला लागले आहेत. काल, ४ मे च्या पहाटे जिल्ह्यातील काही मंदिराच्या वतीने लाऊडस्पिकर लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. दरम्यान खामगाव शहरातील चांदमारी भागात  काल सकाळी हनुमानाची आरती लावण्यात आली असता नियमांचे उल्लघंन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी मंदिराची  साऊंड सिस्टीम जप्त केली. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

चांदमारी भागातील हनुमान मंदिरावर अनेक वर्षांपासून रोज सकाळी हनुमान चालीसा व हनुमानाची आरती लावण्यात येते. न्यायालयाच्या नियमांचे पालन करून लाऊडस्पीकर लावत असल्याचे मंदिर व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मात्र काल पहाटे पाच वाजता  खामगाव शहर पोलिसांनी मंदिरासमोर गाडी उभी करून चार ते पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिरातील बंद असलेली साऊंड सिस्टीम जप्त केली. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मंदिरात आरती करता आली नसल्याचे मनसेचे शहराध्यक्ष आनंद गायगोळ यांनी सांगितले.