चुलत भावांमध्ये वाद, एकाचा सुरा खुपसून खून! मलकापूर तालुक्यातील घटना

 
malkapur
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चुलत भावांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी दरम्यान एकाने दुसऱ्याच्या पोटात सुरा खुपसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथे ही घटना घडली. विशेष म्हणजे मारेकऱ्याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली आहे.

भालेगावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागील परिसरात काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रदीप पद्माकर वानखेडे (३४) व अशांत अशोक वानखेडे यांच्यात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारीत अशांत ने प्रदिपच्या पोटात धारधार सुरा खुपसला व बरगड्यांवर सपासप वार केले. यामुळे प्रदीप घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

त्यानंतर मारेकरी अशांत घटनास्थळावरून पसार झाला. त्याने थेट मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठून खुनाची कबुली दिली. इकडे गावकऱ्यांनी प्रदिपला रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.