फायनान्स कपण्यांना माणुसकी असते का हो? बातमी वाचून तुमच्याही तोंडून हेच शब्द निघतील! खामगावात कर्जदारासोबत घडलेला धक्कादायक प्रकार वाचून फायनान्स कंपन्याचे कर्ज घेण्याआधी दहावेळा विचार कराल..!

 
polis
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): फायनान्स कंपन्यानी नेमलेल्या वसुली एजंटांनी केलेल्या दादागिरीच्या घटना जिल्ह्यात नवीन नाहीत. दोन वर्षांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील एका गावात मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांनी घरात घुसून समान बाहेर फेकले होते, त्यामुळे अपमान सहन न झाल्याने महिलेने आत्महत्या केली होती. चिखली विधानसभेच्या आमदार श्वेताताई महाले यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवल्यानंतर फायनान्स कंपनी च्या वसुली एजंट विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना आठवण्याचे कारण खामगावात सुद्धा फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटांनी दादागिरीचा कहर केला. कर्जदाराला चक्क तीन दिवस एका खोलीत डांबून ठेवत त्याला सिगारेटचे चटके दिले,सोबत त्याच्यावर अमानवीय अत्याचार केला.

 पिडीत कर्जदाराने शेगाव शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली असून तक्रारीवरून वंचित बहुजन आघाडीचा शेगाव शहर अध्यक्ष प्रवीण बोदडे याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगाव येथील ३२ वर्षीय युवकाने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तरुणाने कॅपिटल नावाच्या खासगी फायनान्स कंपनीकडून मालवाहतुकीचे वाहन घेण्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र काही दिवसांनी व्यवसाय मंदित आल्याने ते वाहन अकोला येथील एका व्यक्तीला विकले. कर्जाची रक्कम ज्याला वाहन विकले तो व्यक्ती फेडेल अशी कायदेशीररित्या नोटरी करून करारनामा देखील केला.
   
शेगावातून उचलून खामगावात डांबले..!

दरम्यान ज्याला वाहन विकले त्या व्यक्तीने कर्जाची रक्कम भरली नाही.त्यामुळे रविवारी चार जणांनी शेगावात येऊन पीडित तरुणाला शेगाव रेल्वेस्टेशन जवळ बोलावले.तिथून त्याला उचलून शेगावच्या विश्रामगृहात नेले.रविवारच्या रात्री विश्रामगृहात त्याला बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याला मोटारसायकल वर बसवून खामगावात नेण्यात आले.तिथे शंकर नगर भागातील एका खोलीत त्याला डांबून ठेवण्यात आले.

सिगारेटचे चटके अन् तसला व्हिडिओ..!

  त्यानंतर चौघांनी तरुणाला रात्रभर बेदम मारहाण केली. चौघेही भरपूर दारू पिलेले होते. तरुणाचे हात पाय बांधून त्याच्यावर अमानवीय अत्याचार केला. एवढेच नव्हे तर तरुणाकडून दोन चेक वर त्याच्या हस्ताक्षरात सात लाख रुपयांची रक्कम टाकून जबरदस्ती स्वाक्षरी करून घेतली, त्याचा व्हिडिओ देखील शूट केला. त्यानंतर गाडी परत आणून देतो असे तरुणाने आश्वासन दिल्यानंतर तरुणाला शंभर रुपये देऊन खामगाव बस स्टँडवर सोडण्यात आले. त्यानंतर तरुणाने शेगाव गाठून घडला प्रकार नातेवाईकांना सांगितला. अखेर शेगाव पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार दाखल केली. अत्याचार करणारा प्रवीण बोदडे हा वंचित बहुजन आघाडीचा शेगाव शहर अध्यक्ष आहे. त्याच्याशिवाय विजय काळे( शंकर नगर, खामगाव), मंगेश तायडे( रा. गोंधनापूर) व एका अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.