बेरोजगारीचा आणखी एक बळी! शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; बुलडाणा तालुक्यातील धक्कादायक घटना!
Tue, 3 May 2022

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बेरोजगारीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज,३मे रोजी ही घटना धाड शिवारात उघडकीस आली. विष्णू मोतीराम वाघ (२७, रुईखेड मायंबा, ता. बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक विष्णू हा गेल्या काही वर्षांपासून बेरोजगार होता. नोकरी मिळत नसल्याने तो तणावात होता. कुटुंबाचा सांभाळ करू शकत नसल्याची खंत त्याला वाटत होती. त्यामुळे त्याने धाड शिवारातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. धाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.