पत्नीसह २ चिमुकल्या लेकिंचा घेतला जीव; रात्री दोनला लोखंडी पहारीने दणादण कुटले! मुलगा कसाबसा वाचला; क्रूर बापाला आता भोगावी लागणार कर्माची फळे! मेहकर तालुक्यातील कासारखेडची घटना

 
jyh
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साक्षीदार फितूर झाले तरी, कायद्यापुढे शहाणपण चालत नाही, हे गुन्हेगारांनी आता समजून घ्यायला हवे. कारण आरोपी पुरावे सोडतच असतो. आणि न्याय हा होतच असतो. एका तिहेरी हत्याकांड प्रकरणी  न्याय मिळाला. बुलडाणा जिल्हा हादरवून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांडाचा अखेर निकाल लागला. मेहकर तालुक्यात १२ मार्च २०१६ ला पत्नी व दोन मुलीवर लोखंडी पहारेने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. शिवाय मुलालाही मारण्याचा प्रयत्न झाला होता.२१ डिसेंबरला या प्रकरणाचा मेहकर जिल्हा न्यायाधीशांनी  निकाल दिला असुन, पत्नीसह दोन लेकिंचा खून करणाऱ्याला जन्मठेपेसह १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठेवण्यात आली आहे.आरोपी समाधान शेषराव अंभोरे असे शिक्षा केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे १२ मार्च २०१६ च्या रात्री २ वाजताच्या सुमारास आरोपी समाधान शेषराव अंभोरे याच्या घरातून ओरडण्याचा आवाज येत असल्याने  त्याचा भाऊ आश्रुबा शेषराव अंभोरे व  कुटूंबातील सदस्यांनी आरोपीच्या घराकडे धाव घेवून घराच्या खिडकीतून पाहीले. त्यावेळी  समाधान अंभोरे हा त्याची पत्नी व मुलामुलीला लोखंडी पहारीने मारत त्यांना दिसले. त्यामुळे दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेंव्हा समाधानची पत्नी मीना (४०), मुलगी अश्विनी (१५),अंकिता (१३) वर्षे, मुलगा गोपाल (६) हे जखमी अवस्थेत दिसले, असे आश्रुबा शेषराव अंभोरे याने जानेफळ पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते. दरम्यान चारही जखमींना मेहकर येथील मल्टिस्पेशालिटी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता तिथे अश्विनीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरीत तिन जखमींना छत्रपती संभाजीनगर  येथे उपचारार्थ रेफर करण्यात आले होते. मात्र छत्रपती संभाजीनगर  येथील रुग्णालयात आरोपीची पत्नी मीना व मुलगी अंकिता यांचा मृत्यू झाला.मात्र मुलगा गोपाल  कसाबसा वाचला. या थरारक हत्याकांडाप्रकरणी आरोपी समाधान अंभोरे विरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

 १६ साक्षीदारांपैकी तपास अधिकारी, डॉक्टर वगळता इतर सर्व  साक्षीदार फितूर झाले. सरकार पक्षाचे वकील जे.एम. बोदडे यांनी केलेली साक्षीदारांची उलटतपासणी व युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी समाधान शेषराव अंभोरे यास त्याची पत्नी मीना, मुली अश्विनी व अंकिता यांच्या प्रत्येक खुनाबद्दल नैसर्गिक जीवन असेपर्यंत जन्मठेप, तसेच मुलगा गोपाल याच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल १० वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड अशी शिक्षा मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस. एम. चंदगडे यांनी सुनावली.