अरेच्चा ! बुलडाण्याच्या चिंचोले चौपाटीवर पोलीस उपनिरीक्षकाला २० लाख रुपयांना पडला चहा! पोलिसही म्हटले.. "कुछ तो गडबड है..!!" वाचा काय आहे नेमका प्रकार..!

 
buldana ps
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  काहीपण का राजेहो..५ -१० रुपयांचा चहा २० लाखांना कुठ पडत असतो का? बातमीच हेडिंग वाचून तुमच्या मनात हेच आल असेल..तर थोड थांबा..आम्ही सांगतो नेमका प्रकार काय आहे तर.. बुलडाणा शहरातील वर्दळीच्या असलेल्या चिंचोलो चौक परिसरात चहा पिण्यासाठी थांबणे एका पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. चार चाकी वाहन उभे करून चहा पिण्यासाठी थांबल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी कारचे काच फोडून कारमध्ये ठेवलेली २० लाखांची रोकड पळवली. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक असलेले  नंदकुमार शिमरे हे  छत्रपती संभाजीनगरातील त्यांच्या चार मित्रांसह काल,एका व्यवहाराच्या निमित्ताने बुलडाण्यात आले होते, तेव्हा सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.

 नंदकुमार शिमरे यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांचे मित्र सय्यद मोईन, समीर सय्यद चाऊस,शेख सलमान शेख हबीब, शेख रिजवान शेख हबीब यांच्यासह कारने बुलडाण्यात आले. शिमरे यांना स्थावर मालमत्ता खरेदी करायची होती, यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांकडून आर्थिक मदत मागितली होती. त्यानुषंगाने हे पाच जण बुलडाण्यात एकत्र आले होते. शिमरे यांच्या कार मध्ये २० लाख रुपयांची रोकड होती असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान काल, सायंकाळी ७ च्या सुमारास कार रस्त्यावर उभे करून पाचही जण बुलडाणा शहरातील चिंचोली चौक परिसरातील एका चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी गेले. त्याचवेळी पुढच्या काही मिनिटांत २ अज्ञात दरोडेखोरांनी येत कारचे काच फोडून २० लाख रुपयांची रोकड लंपास केली.
    
  कारमध्ये रोकड असल्याचे दरोडेखोरांना कसे माहीत...?

 बुलडाणा शहरातील चिंचोले चौक परिसरात अनेक कार उभ्या असतात. मात्र शिमरे यांच्या कारमध्ये २० लाख रुपयांची रोकड असल्याचे दरोडेखोरांना कसे माहीत? असा प्रश्न  पोलिसांनाही पडला आहे. मोठ्या व्यवहारात चेक किंवा नेट बँकिंग ने रक्कम देणे घेणे अपेक्षित असताना शिमरे  २० लाख एवढी मोठी रोकड सोबत का बाळगत होते ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांनी जेव्हा शिमरे आणि त्यांच्या सोबतच्या मित्रांची चौकशी केली तेव्हा पाचही जणांचे वक्तव्य परस्पर विरोधी येत होते. त्यामुळे "दाल मे कूछ काला तो नही" असा संशयही पोलिसांना आहे.  तूर्तास शिमरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असला पोलीस तपासानंतर "दूध का दूध और पानी का पानी" समोर येण्याची शक्यता आहे.