शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला घडली अद्दल! विनापरवाना करीत होता कीटकनाशकांची विक्री! कृषीविभागाच्या कारवाईत ५ लाख ८३ हजारांचे किटकनाशके, रासायनिक खते जप्त!

कृषी विभागाच्या भरारी पथकाला पिंप्री गवळी येथे विनापरवाना किटकनाशकांची विक्री सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने सापळा रचून साईरामा हार्डवेअर या दुकानावर छापा टाकला. यावेळी विनापरवाना अवैधरित्या किटकनाशके विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने दुकान मालक रोशन गजानन पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे यांनी धामनगाव बढे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली.
या दुकानातून एकूण ५ लाख ८३ हजार ५२७ रूपये किमतीचे किटकनाशके आणि रासायनिक खते जप्त करण्यात आले आहेत. भरारी पथक प्रमुख कृषी विकास अधिकारी अनिसा महावळे, मोहीम अधिकारी विजय खोंदील, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे, मोताळा तालुका कृषी अधिकारी सचिन मोरे, धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे मोहनसिंग राजपूत, गजानन भराड यांनी ही कारवाई केली. शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी किटकनाशके, बियाणे आणि खते अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राकडूनच खरेदी करुन पक्की पावती घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे.