अपघातांना ब्रेक लागेना! पुन्हा ६ जखमी! हिवरा आश्रम व नागझरी येथे दुचाकींचा अपघात
Jan 16, 2023, 09:14 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या वर्षातील ११ महिन्यात जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या ५२७ वर पोहोचली होती. यामध्ये ३०७ जणांचा मृत्यू झाला.२७४ जखमी झाल्याची आकडेवारी आहे. परंतु प्रशासकीय उपायोजना अभावी या अपघातांना ब्रेक लागत नसल्याचे दिसून येते.१५ जानेवारीला हिवरा आश्रम व नागझरी फाट्याजवळ २ वेगवेगळ्या अपघातात ६ जण जखमी झालेत.
मेहकर ते हिवरा आश्रम मार्गावरील एका पेट्रोल पंपा जवळ पहिला अपघात झाला. सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील राहणारे अशोक भानुदास सुरोशे (५०), विश्वराज कैलास एरमुले (१५) हे दुचाकीने हिवरा आश्रम कडे येत असताना नागझरी बुद्रुक येथील शिवाजी देवकर (५०) यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तिघेही जखमी झाले..
दुसरा अपघात हिवरा आश्रम फाटा नजीक घडला. पिंपरी माळी येथील अजय वानखेडे, तुषार वानखेडे, विशाल वानखेडे हे तीन तरुण दुचाकीने हिवरा आश्रम वरून मेहकर कडे जात असताना, नागझरी बुद्रुक येथे एका वन रस्त्यावर दुचाकीची नियंत्रण सुटल्याने आदळून अपघात झाला. या अपघातात तिघेही जखमी झाले आहेत. वाढत्या रस्ते अपघातांची संख्या चिंतनीय असून, अपघात रोखण्यात प्रशासनाला यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.