भरधाव कार उभ्या ट्रकवर आदळली! घरी न सांगता फिरायला गेलेले दोघे मित्र जागीच ठार! मेहकर तालुक्यातील जयताळा गावचे होते! राहुल एकुलता एक होता.!

 
hgvh
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आई वडिलांना न सांगता फिरायला गेलेल्या दोघा तरुणांचा महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील आदिलाबाद जवळ अपघात झाला. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झाले. ठार झालेले दोघे मेहकर तालुक्यातील जयताळा गावचे रहिवासी असून त्यापैकी एक आईवडिलांना एकुलता एक होता. आज, १४ सप्टेंबरला पहाटे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 राहुल सांगोळे (२०) व महादेव केशव जैताळकर(२१) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. राहुल हा आईवडिलांना एकुलता एक होता. त्याचे वडील मेहकर पोलीस ठाण्यात होमगार्ड आहेत. मुलाला डॉक्टर बनविण्यासाठी त्यांनी राहुल ला शिक्षणासाठी लातूरला पाठवले होते.  दरम्यान महादेव कडे स्वतःची गाडी आहे.

त्याने मित्र राहुल व इतर मित्रांसोबत फिरायला जायचा प्लॅन केला. मात्र इतर मित्र सोबत न आल्याने महादेव ने राहुल ला नांदेड ला बोलावून घेतले. महादेव मेहकर वरून नांदेड ला गेला तिथून दोघे एकत्र फिरायला निघाले होते. मात्र आज पहाटेच्या सुमारास त्यांची कार रस्त्यात उभ्या ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण होता की दोघांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे मेहकर तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे.