अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला बलात्कार! आता भोगावी लागणार पापाची फळे! कांड करायला मदत करणाऱ्या साथिदारालाही न्यायालयाचा दणका! चिखली तालुक्यातील अमोना गावची घटना

 
andhera
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ९ व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर २ दिवस बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने त्याच्या पापाची शिक्षा ठोठावली. त्याला आता १० वर्षे  कारावास  भोगावा लागणार असून  १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. विशेष मुलगी पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपीच्या साथीदाराला देखील न्यायालयाने दणका दिला असून त्याला ५ वर्षांच्या करावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील अमोना येथे २०१७ ला हे प्रकरण घडले होते. विष्णू रामकिसन भोसले(२६, रा.अमोना) असे आरोपीचे नाव असून कल्याण सुभाष आटोळे याने कांड घडवण्यात मदत केली होती.
                                                  जाहिरात

baba

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना २०१७ ची आहे. त्यावेळी पीडित मुलगी ९ व्या वर्गात शिकत होती. ती अचानक गायब झाल्याने तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती सापडली नव्हती. त्याचवेळी गावातील विष्णू रामकिसन भोसले हासुद्धा गावात नसल्याने त्यानेच आपल्या मुलीला पळवले असल्याचा संशय पीडितेच्या वडिलांना आला. त्याला फोन केला असता तुमच्या मुलीला पळवून आणल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे अंढेरा पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विष्णू भोसले विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका केली. विष्णू भोसले याने फुस लावून पळवून नेल्यानंतर त्यावेळच्या औरंगाबाद शहरात त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने पोलिसांना जबाबात सांगितले. तसेच विष्णू भोसले याला कल्याण सुभाष आटोळे याने मदत केल्याचेही  पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
    
  न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीचे वडील, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ऍड आशिष केसाळे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. मेहेरे यांनी मुख्य आरोपी विष्णू भोसले याला १० वर्षांचा कारावास व १ हजार दंड व त्याचा साथीदार कल्याण आटोळे याला ५ वर्षे कारावास व १ हजार दंड अशी शिक्षा सुनावली.