सरकारी दवाखान्यात डॉक्टरला मध्यरात्री बेदम मारले! आरोपींना न्यायालयाने सुनावली "ही" शिक्षा! मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल!

 
kort
मेहकर (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शासकीय कामात अडथळा  निर्माण केल्या प्रकरणी तीन आरोपींना  सश्रम कारावास व दंडाची शिक्षा स्थानिक न्यायालयाने ८ जुलै रोजी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार डॉ. ज्ञानेश्वर खंडूजी तायडे हे तालुक्यातील देऊळगाव माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना  १४ ऑक्टोबर २०१० च्या रात्री ११.३० वाजता देऊळगाव माळी येथील पवन उर्फ टिल्लू सुरेश गाभने व दीपक सोपान तुंबड यांनी शासकीय निवासस्थान वर घेऊन टिल्लू उर्फ पवन याचे पोट दुखत असल्याचे सांगितले. त्यांना  डॉक्टरांनी औषधी देऊन सकाळी दवाखान्यात येण्याचे सांगितले. घराचा दरवाजा बंद करत असताना दरवाजावर कोणीतरी लाथा बुक्क्या मारल्याचा आवाज आल्याने डॉक्टरांनी दार उघडले. त्यावेळी पवन आणि दीपक यांच्यासोबत सचिन गिऱ्हे हा उभा होता.

त्यांनी डॉक्टरला  बाहेर बोलावले. त्याचवेळी दवाखान्याचे मुख्य दारावर सचिन सखाराम मगर हा उभा होता. काहीच कारण नसताना सचिन मगर याने डॉक्टरला  शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी पोटात,छातीत,पाठीवर मारहाण केली. डॉक्टर त्याच्या तावडीतून सुटून दवाखान्यात पळाले. त्यावेळी सचिन मगर,दीपक तुंबड व टिल्लू गाभणे यांनी परत मारहाण केली. यावेळी सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या तावडीतून  सोडविले.अशी तक्रार डॉ. ज्ञानेश्वर तायडे यांनी दिल्याने मेहकर पोलिसांनी सचिन मगर,दीपक तुंबड व टिल्लू गाभणे या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासांती आरोपपत्र स्थानिक जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केले होते.

सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरकारी अभियोक्ता जी.जी.पोफळे यांनी चार साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सचिन मगर,दीपक तुंबड व टिल्लू गाभणे या तिघांना कलम ३५३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व ३००० रू.दंड,तसेच कलम ३२३अन्वये सहा महिने सश्रम कारावास व ५०० रू.दंड,कलम ५०४अन्वये सहा महिने सश्रम कारावास व १००० रू.दंड तसेच वैद्यकीय सेवा प्रतिबंधित अधिनियम अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व ३००० रू.दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही.केंद्रे  ठोठावली आहे. आरोपींना या सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. दंडाच्या रकमेपैकी दहा हजार रुपये तक्रारदार डॉ. ज्ञानेश्वर तायडे यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.