शेगावच्या सराफा व्यापाऱ्यावर पोलीस कोठडीत अनैसर्गिक अत्याचार प्रकरण! ६ पोलीस शिपाई निलंबित

 
kraim
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणारी घटना फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली होती. शेगाव येथील एका सराफा व्यापाऱ्याला अटक केल्यानंतर त्याच्यावर  अकोला येथे पोलीस कोठडीत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी चौकशीअंती अकोला पोलीस दलातील ६ पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी ही कारवाई केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. बुलडाणा येथील तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी याप्रकरणाची चौकशी केली होती.

शेगाव येथील एका दागिन्यांच्या व्यापाऱ्याला अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. चोरीचे दागिने विकत घेतल्याचा आरोप त्या व्यापाऱ्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान व्यापाऱ्याला अकोला येथे नेत असताना गाडीत उलटे टांगून आरोप केल्याचा आरोप व्यापाऱ्याने केला होता. त्यानंतर अकोला येथे पोलीस कोठडीत असताना तिथे आधीच असलेल्या दोन गुन्हेगारांना व्यापाऱ्याशी अनैसर्गिक संभोग ठेवण्याचे पोलिसांनी सांगितले होते . पोलिसांच्या सांगण्यावरून व्यापाऱ्यावर  अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकारांनंतर अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 बुलडाणा जिल्ह्याचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक व सध्या एनआयए मध्ये असलेले बजरंग बनसोडे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी होती. त्यांनी केलेल्या चौकशीनंतर अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आला होता. त्यानंतर अनैसर्गिक अत्याचार  करायला लावणाऱ्या पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.