सैन्यभरती घोटाळ्या प्रकरणातील भामट्या आरोपींविरोधात धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

रॅकेटमध्ये बुलडाणा शहरातील नामवंत व्यापाऱ्याचा होता समावेश! सैन्यदलात नोकरी लावून देतो म्हणत उकळले होते १० लाख; मुलाच्या नोकरीसाठी सातगाव म्हसला येथील शेतकऱ्याने विकली होती शेती
 
dhad

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सैन्यदलात नोकरी लावून देतो, असे आमीष दाखवत तब्बल ७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी धाड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत म्हसला खुर्द येथील सुखदेव नामदेव जाधव यांनी धाड पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. 

तक्रारदार सुखदेव जाधव यांचा मुलगा अजयकुमार सुखदेव जाधव याला सैन्यदलात नोकरी लावून देतो, असे आरोपी पुरुषोत्तम त्र्यंबक सोनुने (रा. मासरुळ), नितीन आकाराम बारपेठे (रा. कामेरी, ता. वळवा, जि. सांगली), अजय नागपुरे (रा. बुलडाणा) या तिघांनी त्याला सांगितले. जाधव परिवार म्हसला खुर्द येथे मजुरी करतात. जर मुलाला सैन्यदलात नोकरी लागली तर कुटुंबाचे भले होईल, या उद्देशाने त्यांनी पैशांची जुळवाजुळव सुरू केली. सुखदेव यांचे वडील नामदेव जाधव यांनी आपल्या एकुलत्या एक नातवाला नोकरी लागत असल्याचे पाहून स्वतःची गट नं. १२१ मधील ४४ आर. जमीन विक्री करून आरोपींना १९ डिसेंबर २०१५ रोजी ७ लाख रुपये दिले.  तसेच ३ लाख रूपये हे बाहेर फिरण्यासाठी दिले. असे एकूण १० लाखाची फसवणूक केली आहे.  परंतु पैसे घेतल्यानंतर आरोपींनी सुखदेव यांचा मुलगा अजयकुमार याला सैन्यात कोणतीही नौकरी लावून दिली नाही. आरोपींकडे सुखदेव व अजयकुमार यांनी वारंवार यासंदर्भात तगादा लावला. त्या वेळी आरोपी सातत्याने त्यांना फक्त आश्वासने देत राहिले. मात्र, नौकरी शेवटपर्यंत लावली नाही. अखेर पीडितांनी धाड पोलिसांकडे धाव घेतली. 

नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी बुलडाणा सचिन कदम यांच्या मागदर्शनाखाली धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. पाटील यांच्या आदेशाने त्यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी सखोल चौकशी करून या घटनेच्या शेवटपर्यंत  पोहचले आणि आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.