पेरणीसाठी ६० हजार घेतले होते, परत देतांना वावर विकून २ लाख दिले! तरीही देऊळगावराजा तालुक्यातील वाकीचा शिवानंद भोसले शेतकऱ्याला म्हणे माझे ८ लाख कधी देतो! गळ्याला चाकू लावून घरात डांबून ठेवले,
खेळ खल्लास करतो म्हणाला! गारखेडच्या शेतकऱ्याचा जीव पोलिसांनी वाचवला

गारखेड येथील योगेश शिंगणे यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार वाकी येथील शिवानंद भोसले हा गारखेड येथे शिकारीसाठी जायचा, त्यातून योगेशची शिवानंद भोसले यांच्यासोबत ओळख झाली. २०२० मध्ये योगेशने पेरणीसाठी शिवानंद कडून ३० हजार रुपये घेतले व चार महिन्यांनी ५४ हजार रुपये द्यायचे ठरले. चार महिन्यांनी योगेश ने शिवांनंद कडून पुन्हा ३० हजार घेतले. असे आधी ३० व नंतर ३० असे एकूण ६० हजार रुपये योगेश ने शिवानंद भोसले याच्याकडून घेतले. योगेश वेळेवर शिवानंद चे पैसे देऊ शकला नाही. २०२१ मध्ये योगेश ने त्यासाठी स्वतःची २० गुंठे जमीन ४ लाख रुपयाला विकली. त्यातील २ लाख रुपये योगेश ने शिवानंद याला देऊन टाकले. त्यादिवशी गावातील दोघे तिथे हजर होते असे योगेशने तक्रारीत म्हटले आहे.
८ लाख कधी देतो, खेळ खल्लास करतो..!
दरम्यान योगेशच्या तक्रारीनुसार २२ मे रोजी सकाळी शिवानंद चा योगेश यांना फोन आला. माझे ८ लाख रुपये कधी देतो अशी विचारणा शिवानंद ने केली. त्यावर आपला व्यवहार २०२१ मध्ये क्लिअर झाला आहे,माझे तुम्हाला काहीही देणे लागत नसल्याचे योगेशने सांगितले. दुपारी दीड वाजता शिवानंद ने पुन्हा केला मात्र योगेशने फोन उचलला नाही. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता देऊळगावमही च्या दिग्रस चौकात असताना योगेशला शिवानंद ने पाहिले. शिवानंद योगेशजवळ गेला व मला सरंबा फाट्यावर सोडून दे असे म्हणू लागला. शिवानंद योगेशच्या गाडीवर बसला. देऊळगाव मही कडून सरंबा फाट्याकडे जात असताना शिवानंद ने पेट्रोल पंपाजवळ गाडी थांबवायला लावली. माझ्या सोबतचा माणूस रोडवर उभा आहे असे म्हणत रोडवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला गाडीवर मध्ये बसवले आणि गाडी पुढे घ्यायला लावली. गाडी सरंबा फाट्यावर गेल्यावर मध्ये बसलेल्या त्या अनोळखी व्यक्तीने योगेशच्या पोटाला चाकू लावला आणि गाडी वाकी फाट्यावर घ्यायला सांगितली.
वाकी फाट्यावर गेल्यावर त्यांनी गाडी पारधी वस्तीवर घ्यायला सांगितली. तिथे शिवानंद भोसले यांच्या घरात योगेशला नेण्यात आले. तिथे योगेशच्या गळ्याला चाकू लावला, तू घरी फोन कर आणि कोणालाही ८ लाख रुपये घेऊन यायला सांग, पैसे आणल्यावर तुला सोडतो नाहीतर तुझा खेळ खल्लास करतो असे शिवानंद योगेशला म्हणू लागला. त्यावेळी योगेशने लगेच घरी फोन केला नाही. योगशच्या मोबाईल वर येत असलेले फोन योगेशला उचलू देत नव्हते. जवळपास रात्री ९ वाजता योगेशने भावाला फोन करून घडलेली हकीकत सांगितली,८ लाख रुपये आणले तरच माझा जीव वाचेल असे सांगितले. योगेशच्या भावाने तातडीने ही बाब देऊळगाव मही येथे जाऊन पोलीस चौकीवर सांगितली. अंढेरा पोलिसांनी वाकीच्या सरपंचांना शिवानंद भोसले यांच्या घरी पाठवले. फोनवरून पोलिसांनी शिवानंद भोसले याला कारवाईचा इशारा दिला, त्यानंतर पोलिसांनी चक्रे हलविल्याने रात्री साडेअकरा वाजता योगेशची सुटका करण्यात आली. मात्र एवढे होऊनही उद्या दुपारी १ वाजेपर्यंत ८ लाख रुपये आणून दिले नाही तर जिवाने मारून टाकील अशी धमकी शिवानंद भोसले याने योगेशला दिली. तोपर्यंत या घटनेची वाच्यता झाल्याने शिवानंद भोसले यांच्या घराजवळ बरेच जण जमले होते. दुसऱ्या दिवशी योगेशने याप्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शिवानंद भोसले व योगेशच्या गळ्याला चाकू लावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.