खुन्यांची माहिती देणाऱ्यांना ५० हजारांचे बक्षीस जाहीर!

कमलेश पोपट हत्‍याकांड; दोन संशयितांना मध्यरात्री घेतले ताब्‍यात
 
कमलेश पोपट

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच नव्‍हे जर जिल्ह्याला हादरवणाऱ्या कमलेश पोपट हत्याकांडाच्या तपासाचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. तपासासाठी ५ पथके नियुक्त करण्यात आली असून, खुन्यांची माहिती देणाऱ्यांना कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरोडेखोरांची माहिती चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक लांडे, सहायक पोलीस निरिक्षक अमोलकुमार बारापात्रे व पोलीस नाईक शरद गिरी यांना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने या प्रकरणात जिल्ह्यातील एका वस्तीवरून दोन संशयितांना १७ नोव्हेंबरला मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. त्‍यांची कसून चौकशी सुरू आहे.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेदहाला चिखली रोडवरील जयस्तंभ चौक परिसरातील आनंद इलेट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांची तीन चोरट्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी व भाजपने १७नोव्हेंबर रोजी कडकडीत बंद पुकारला होता. या घटनेमुळे व्यापारीही दहशतीखाली आहेत. रोज रात्री दहापर्यंत चालणारी दुकाने आता साडेआठ -नऊलाच बंद होत आहेत. दुसरीकडे पोलिसांनीही खुन्यांना पकडण्यासाठी कंबर कसली असून, सर्व मार्गांचा अवलंब करून खुन्यांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. काल, १७ नोव्हेंबरच्या रात्री पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. जिल्ह्यातील एका वस्तीवर पोलीस संशयितांना पकडण्यासाठी गेले तेव्हा स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना विरोध केला .डोळ्यांत मिरची पूड फेकण्याचीही प्रयत्न झाला. मात्र पूर्ण तयारीने गेलेल्या पोलिसांनी दोघांना उचलले. मात्र प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. संपूर्ण अधिकृत सत्य उघड येईपर्यंत व तपासासंदर्भात गोपनीयता पाळण्यात येत असल्याने या संशयितांना कुठून उचलले, याबाबतची माहिती पोलिसांनी जाहीर केलेली नाही.