५ वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या विकृत युवकास ५ वर्षांचा कारावास! बुलडाणा न्यायालयाचा निकाल! बुलडाणा तालुक्यातील उमाळा गावात घडली होती घटना!

 
nyayalybuladana
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मैत्रिणी सोबत खेळणाऱ्या ५ वर्षीय  निरागस बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून  तिचा विनयभंग करणाऱ्या विकृत व वासनांध युवकास बुलडाणा न्यायालयाने ५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेला उत्कृष्ट तपास, पीडित बालिकेसह तिच्या बालमैत्रिणींनी दिलेली साक्ष व घटनाप्रसंगी दाखविलेले प्रसंगावधान, सरकारी वकिलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ही या खटल्याची  वैशिष्ट्ये ठरवीत. सुमारे दोन वर्षातच पीडितेला न्याय मिळवून देणाऱ्या व विकृत, लंपटाना जरब बसविणाऱ्या या खटल्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे. 

बुलडाणा तालुक्यातील उमाळा येथील ५ वर्षीय बालिका मागील ३० मे २०२० रोजी  दुपारी १२ वाजता तिच्या ३ मैत्रिणीसह खेळत  होती. यावेळी तिथून जाणाऱ्या गणेश तुकाराम तायडे (३८) या नराधमाची तिच्यावर वाईट नजर पडली. त्याने पीडित बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या घरात नेले. यावेळी तिच्या मैत्रिणींनी ही बाब सांगितली असता तिची आजी व एक महिला यांनी तायडेचे दार ठोठावून जाब विचारला

यावेळी पिडीत बालिकेने झालेला घृणीत प्रकार आजीला सांगितला. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व  अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी विशेष अधिकारी या नात्याने घटनेचा सखोल तपास केला. नापोकॉ  निलेश झगरे यांनी तपासात विशेश सहकार्य केले. सुनावणीसाठी हा खटला जिल्हा  व सत्र न्यायाधिश श्री आर.एन मेहरे यांच्या समक्ष आला.

यावेळी पीडित बालिका, तिच्या मैत्रीण, तिची आजी ,  पीएसआय मंगला वाकडे, नापोकॉ  निलेश झगरे यासह १३ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी वकील एस. पी. हिवाळे यांनी  केलेला  युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधिश श्री मेहरे यांनी  आरोपी गणेश तायडे याला विनयभंग व अट्रोसिटी अंतर्गत  ३ वर्षे कारावास व १ हजार दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी शिक्षा आणि कलम ३५४, ३५४- अ ,३५४- ब नुसार ५ वर्षे कारावास व १ हजार रुपये  दंड अशी शिक्षा ठोठावली. बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने  गणेशला आता त्याची पापाची फळे भोगावी  लागणार आहे.