मेहकरच्या व्यापाऱ्याला मागितली ५ लाखांची खंडणी!

पैसे न दिल्यास कुटुंबाचे बरेवाईट करण्याची धमकी!!
 
 
मेहकर पोलीस ठाणे
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर येथील महेश ट्रेडिंग कंपनीचे मालक धीरज उत्तमचंद पारख (३६) यांना कुरियरने आलेल्या पत्राद्वारे ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. पैसे न दिल्यास कुटंुबाला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी १ जुलैलासुद्धा त्‍यांना अशाप्रकारे चिठ्ठी पाठवून ५ लाखांचीच खंडणी मागण्यात आली होती. त्‍यानंतर आता २८ ऑक्‍टोबरला मिळालेल्या चिठ्ठीतूनही तीच मागणी आणि तीच धमकी आहे. त्‍यामुळे दोन्‍ही चिठ्ठ्यांचा सूत्रधार एकच असण्याची शक्‍यता आहे. मेहकर पोलिसांनी १ नोव्‍हेंबरला गुन्‍हा दाखल करून चिठ्ठी कुठून आली, कुणी पाठवली याचा शोध सुरू केला आहे.

धीरज पारख यांचे डोणगाव रोडवर महेश ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. त्‍यांच्‍या दुकानात १० नोकर आहेत. जून महिन्यात अंजनी (ता. मेहकर) येथे त्‍यांनी ४ एकर शेतजमीन घेतली. त्‍यानंतरच हे धमकीसत्र सुरू झाले आहे. १ जुलैला अॉटो रिक्षाच्या (MH28 BA676) चालकाने खंडणीचे धमकीपत्र बंद पाकिटात आणून दिले होते. बायपासवरील साई बाबा मंदिराच्‍या पाटीजवळील दोन लिंबाच्या झाडाजवळ पैसे ठेवण्यास सांगितले होते. त्‍यावेळीही श्री. पारख यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती.

आता कुरियरने आले धमकीपत्र...
२८ ऑक्‍टोबरला सकाळी ११ च्‍या सुमारास डीटीडीसी एक्‍स्‍प्रेस आैरंगाबाद या कुरिअर कंपनीकडून बंद पाकिटाचे कुरिअर आले. ते दुकानातच उघडून पाहिले असता त्‍यातही खंडणी मागण्यात आली होती. १ जुलैला आलेल्या पत्रातील आणि या चिठ्ठीतील हस्‍ताक्षर सारखेच असल्याने सूत्रधार एकच असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सोचो दिवाली देखनी है तो पैसे रखना... नही तो... अशी धमकी नव्या चिठ्ठीत आहे. शेतीचे खरेदी व्यवहार झाल्यानंतर एक महिन्याने पहिली चिठ्ठी मिळाली. त्या शेतात ले आउटचे काम चालू करताच दुसरी चिठ्ठी मिळाली. त्‍यामुळे शेतीच्या व्यवहारामधून किंवा वैयक्तीक कारणावरून कुणीतरी खंडणीच्या चिठ्ठ्या पाठवत असल्याची शंका पारख यांनी तक्रारीत व्यक्‍त केली आहे. त्‍यामुळे पारख आणि त्‍यांचे कुटुंबीय भयभीत झाले आहे.