कत्तलीसाठी जाणारे ५ गोवंश नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले!

मलकापूरमध्ये कारवाई
 
 
file photo

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मालवाहू वाहनातून पाच गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक होत असताना सतर्क नागरिकांनी वाहन अडवले. मलकापूर शहर पोलिसांना बोलावून वाहन ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करून वाहनासह २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेलाड येथील श्रीहरी गोशाळेत गोवंश नेण्यात आले आहेत. मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पाचपांडे पेट्रोल पंपासमोर काल, २४ नोव्‍हेंबरला दुपारी ही कारवाई करण्यात आली.

शेख समीर शेख नासिर (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे वाहनचालकाचे नाव आहे. तो मुक्ताईनगरवरून खामगावकडे  बोलेरो पिकअप वाहनातून ४ गोवंश घेऊन निघाला होता. ही माहिती नागरिकांनी पत्रकार दीपक ईटणारे व बजरंग दलाचे ऋषिकेश नेमाडे यांना दिली. या दोघांच्या मदतीने नागरिकांनी वाहन अडवले. वाहनात जनावरे अक्षरशः कोंबलेल्या अवस्‍थेत होती. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांना देण्यात आल्यानंतर त्‍यांनी एएसआय नरेंद्रसिंह ठाकूर यांना घटनास्‍थळी पाठवले. वाहन शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. शेख समीरला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नापोकाँ सचिन पाटील करत आहेत.