SPECIAL REPORT बुलडाणा जिल्ह्यात ५ महिन्यांत ३३ बलात्कार! बहुतांश बलात्कार प्रेम संबंधातून; काहींनी लग्नाचे आमिष दाखवून संधी साधली अन् वेळ आल्यावर दगा दिला.!

एक बलात्कार तर निराळाच, ज्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली, जामीनावर सुटल्यावर त्याच्याशीच केले लगीन! वाचा काय आहे प्रकरण..

 
crime
बुलडाणा(कृष्णा सपकाळ बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात एका ३५ वर्षीय विवाहितेवर ८ जणांनी कथित सामूहिक बलात्कार केल्याची घटना १३ जुलैच्या सायंकाळी घडली. विवाहित महिला तिच्या मित्रासोबत राजूर घाटात गेली होती, त्यावेळी हा प्रकार घडल्याचे विवाहितेसोबत असलेल्या तिच्या मित्राने तक्रारीत सांगितले. घटनेच्या दिवशी रात्री उशिरा बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.आरोपींच्या तपासासाठी ३ पथके तयार केली, ८ पैकी ४ आरोपी ताब्यातही घेतले आहेत. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असताना सदर महिलेने आपल्यावर बलात्कार झालाच नसल्याचे बयाण नोंदवले शिवाय सामूहिक बलात्कारासंदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला, त्यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान यंदा जानेवारी ते मे या ५ महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराच्या ३३ घटना उजेडात आल्या आहेत. ३३ पैकी ३३ प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. 
 

add

                                    ( जाहिरात )

१ जानेवारी २०२३ ते ३१ जून २०२३ या ५ महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात बलात्काराचे ३३ गुन्हे दाखल झाले आहेत. ३२ प्रकरणातील पीडितांना त्यांच्यावर बलात्कार कुणी केला हे ठाऊक होते, त्यामुळे संबंधित प्रकरणात आरोपी निष्पन्न करण्याची गरज पोलिसांनी भासली नाही. मात्र  चिखली तालुक्यातील रोहडा येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी कठोर मेहनत घेऊन सदानंद रोडगे नावाचा नराधम आरोपी निष्पन्न केला. सदानंद त्याच्या कर्माची फळे बुलडाणा कारागृहात भोगत आहे.

  इश्क - रोमान्स अन् पटल नाही की बलात्कार? 
   
जिल्ह्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक घटना या प्रेमप्रकरणातून झाल्या आहेत. आधी प्रेम त्यानंतर शारीरिक संबंध मात्र लग्नाच्या वेळी त्याने दगा दिला की बलात्कार...असे एकंदरीत बहुतांश तक्रारींचे स्वरूप असते. लॉज वर, प्रियकराच्या रूमवर आपल्यावर बलात्कार झाल्याचे तक्रारीत नमूद असते. "त्याने मला लग्नाचे आमिष दाखवले, लग्नानंतर आपण "ते" करणारच आहोत मग आता केले तर काय बिघडले असे म्हणत त्याने माझ्यावर वारंवार बलात्कार केला." अशा स्वरूपाच्या तक्रारी पीडित तरुणी करतात. सगळ  काही कळत असूनही महिलेची तक्रार  म्हणून पोलिसांना तक्रारी दाखल करून घ्याव्या लागतात, त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसते.  मात्र न्यायालयात प्रकरणे दाखल झाल्यानंतर अपवाद वगळता बहुतांश प्रकरणातील आरोपी(?) निर्दोष सुटतात किंवा त्यांना अगदी किरकोळ स्वरूपाची शिक्षा होते. सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्काराचे स्वरूप दिल्याने अनेकदा न्यायालय फिर्यादीलाच झापते. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात मात्र आरोपींना कठोर शिक्षा होते. 

ज्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली त्याच्याशीच केले लगीन..!

 गेल्या वर्षी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात चिखली रोडवर राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि बळजबरी गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुंदरखेड येथे राहणाऱ्या एका डॉक्टरलाही पीडितेचा बळजबरी गर्भपात केल्यामुळे आरोपी करण्यात आले होते. सुंदरखेड भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने या प्रकरणाची तक्रार दिली होती. तिचे तरुणाशी प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले, त्यातून ती गर्भवती राहिली. एका खासगी डॉक्टरच्या मदतीने त्यांनी गर्भपात करून घेतला. दरम्यान काही दिवसांनी तरुणाला स्वतःच्या जातीतील एका मुलीचे स्थळ आले. पसंती झाली , साखरपुडा झाला. ही बाब तरुणाच्या प्रेयसीला कळाल्याने तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने त्याच्या घरी जाऊन राडा केला शेवटी तिने पोलिसांत प्रियकराविरुद्ध बलात्कार, ॲट्रॉसिटीची तक्रार दिली.

 तरुणाला अटक झाल्याने ही "भानगड" जिच्याशी साखरपुडा झाला तिलाही कळली. त्यामुळे ठरलेले लग्न मोडले. तरुणाचे  वडील वारलेले,घरी आई एकटीच. एकुलत्या एका मुलाचे कारनामे कळल्याने काही दिवसांनी तरुणाच्या आईचा हृदयाच्या आजाराने मृत्यू झाला. दरम्यान जामिनावर सुटका झाल्यानंतर तरुणाचा पुन्हा त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार देणाऱ्या प्रेयसीशी संपर्क झाला. पुन्हा सुत जुळले आणि काही महिन्यांपूर्वी दोघांनी लगीन केले. ही घटना कळल्यानंतर पोलीसही हैराण झाले,आता काय करावं बा..? मात्र काही झालं तरी आकडेवारीत बलात्काराच्या एका गुन्ह्याची भर पडली होती..!

क्रूर बलात्कार..

दरम्यान काही घटना मात्र प्रचंड संताप आणणाऱ्या असतात. ४ वर्षांपूर्वी चिखलीत ९ वर्षीय चिमुकलीवर ३ नराधमांनी क्रूर बलात्कार केला होता.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आई - वडिलांच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीला नराधमांनी उचलून नेले होते. तत्कालीन ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी दोनच दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांची भूमिका बजावली होती. वर्षभरातच या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन महिन्यांआधी चिखली तालुक्यातील रोहडा येथील अल्पवयीन मुलीचे बलात्कार आणि हत्या प्रकरणही चीड आणणारे होते.