फेसबुकवर लिहिले होते ३०२ !

हिंसक भाषेतील पोस्‍ट टाकून दिली होती मोठ्या घटनेची वर्दी!!; कमलेश पोपट हत्‍याकांडातील तिन्‍ही आरोपी १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत
 
 
कमलेश पोपट

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः "हात कट जाएंगे लेकिन जोडेंगे नहीं, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नही...' अशा प्रकारची हिंसक पोस्‍ट फेसबुकवर मारेकऱ्यांनी टाकली होती, पण तेव्हा त्‍यांच्‍या डोक्‍यात इतकी क्रूरता भरलेली असेल याचा थांगपत्ताही कुणाला नव्हता. त्‍यांनी या पोस्‍टला सत्‍यात उतरवत चिखलीच्या आनंद इलेक्‍ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांची १६ नोव्‍हेंबरला निर्घृण हत्‍या केली. तिन्‍ही मारेकऱ्यांना काल, २५ नोव्हेंबरला अटक केल्यानंतर आज, २६ नोव्‍हेंबरला चिखली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल किसन जायभाये (२३, ह. मु. देऊळगाव मही, मूळ रा. रोहणा, ता. देऊळगाव राजा), नामदेव पंढरीनाथ बोंगाणे (२०) व राहुल अशोक बनसोडे (२०, दोघे रा. धोत्रा नंदई, ता. देऊळगाव राजा) यांच्या चौकशीतून आता पोलिसांना हव्या असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे कोठडीत मिळू शकतील. वयाच्या अवघ्या विशीतच हे तरुण गुन्हेगारीकडे का वळले, याचीही चौकशी केली जाईल. सहा महिन्यांपूर्वी राहुल जायभायेचा कमलेश पोपट यांच्याशी होम थिएटर खरेदीवरून वाद झाला होता. त्‍यावेळी केलेल्या शिविगाळीचा बदला घेण्याची संधी राहुल शोधत होता. सुडाग्नीने तो पेटून उठल्याचे आता समोर येत आहे. तो अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध औरंगाबाद जिल्ह्यातही गंभीर गुन्हे दाखल आहेत. विश्वसनीय सूत्रांच्‍या माहितीनुसार राहुलला लहानपणापासून भाईगिरीचा नाद आहे.

गुन्हेगारी वृत्तीच्या मित्रांच्या सहवासामुळे तो अट्टल गुन्हेगार होण्यास मदतच झाली. गुन्हेगारी विश्वात त्याला अँड्रॉईड या टोपन नावाने ओळखले जाते. त्याचा दुसरा साथीदार राहुल बनसोडे त्याचा जवळचा मित्र झाला. राहुल बनसोडेने नामदेव बोंगाणे यालाही साथीदार करून घेतले. नामदेवचे वडील वारकरी आहेत. मात्र त्‍यांचा मुलगा संगतीने बिघडला. तिघेही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. फेसबुकवरील पोस्टही त्‍यांच्‍या गुन्‍हेगारी वृत्तीचेच दर्शन घडवतात. राहुल जायभाये आणि राहुल बनसोडे यांनी फेसबुकवर टाकलेल्या फोटोमध्ये ३०२ लिहिलेले दिसते. हात कट जाएंगे लेकिन जोडेंगे नहीं, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नही... अशा प्रकारची हिंसक व्हिडिओ राहुल जायभायेने टाकली होती. यावरून त्याची कुणाशी तरी दुष्मनी असल्याची खात्री होते. दुसरा साथीदार राहुल बनसोडे यानेही स्वतःच्या फोटोवर ३०२ असा आकडा लिहून पिस्तूल घेतलेला फोटो अपलोड केलेला आहे. क्रिमिनल वृत्ती असल्यानेच पोपट यांचा त्यांनी निर्दयीपणे खून केला. मात्र आता पोलिसांनी पकडल्याने त्यांना जेलची हवा खावी लागणार एवढे निश्चित.