जिल्ह्यात यंदा रोखले ३० बालविवाह ! मात्र गुपचूप उरकलेल्या बालविवाहाचे उत्तर कोणाकडे? तुम्हीही बालविवाह थांबवू शकता; कसा ते वाचा...

 
vivah
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात गुपचूप पद्धतीने बालविवाह उरकले जातात. अजूनही मोठ्या संख्येने बालविवाह होत आहेत. यावर्षी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने ३० बालविवाह रोखले हे यंत्रणेचे यश असले तरी झटपट उरकण्यात आलेले बालविवाह चिंतेची बाब ठरत आहे.

 कंबरतोड महागाईमुळे आर्थिक टंचाई, मुलींवर लादण्यात आलेले विविध प्रकारचे निर्बंध,पैसे नसल्यामुळे मुलींची लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल, स्थलांतर अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.मात्र त्याचवेळी अवैधरित्या होणारे हे विवाह थांबावे व मुलींचे आयुष्य सुरक्षित राहावे यासाठी हेल्पलाइन, सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांनी एकत्रितरित्या काम केल्याने बालविवाह रोखण्यात य़श मिळत आहे. कायद्यानुसार, मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ वर्षे झाल्याशिवाय विवाह लावणे गुन्हा आहे. कायद्याने बंद झालेली बालविवाहाची प्रथा पुन्हा डोके वर काढू लागली आहे. चाईल्ड लाईनवरुन मिळालेल्या माहिती किंवा तक्रारीवरून बालसंरक्षण समिती व पोलिस अधिकारी बालविवाह रोखतात. पण, गुपचूप पद्धतीने उरकलेल्या बालविवाहाचे काय, याचे उत्तर कोणाकडेच नाही. शालेय शिक्षण विभाग, बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे केल्यास गुपचूप झालेल्या बालविवाहाची वस्तुनिष्ठ माहिती समोर येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा मुळासकट बंद होण्यासाठी जनजागृती, प्रबोधन व कायदेशीर कडक कारवाई आणि शासकीय योजनांची फेररचना करावी लागणार असे ही म्हटल्या जात आहे.

जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी म्हणतात...

बुलडाणा जिल्ह्यात बाल विवाहाची वाढती संख्या पाहता ग्रामपंचायत आणि शहरी भागात बाल विवाह प्रतिबंध अधिनियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनाने नव्याने बाल विवाह प्रतिबंध कायदा नियम २०२२ अमलात आणलेला असून कर्तव्यात कसूर करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही निश्चित करण्यात येईल. असे जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी सांगितले.

जिल्ह्याचे बालसंरक्षण अधिकारी म्हणतात..

  बालविवाह प्रकरणी माहिती मिळाल्यास, बालमदत क्रमांक १०९८ किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात यावी. सध्या बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती सुरू आहे. जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा,संग्रामपूर तालुक्यात बेटी बचाव अंतर्गत महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंध कायदा नियम २०२२ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करिता शाळा- महाविद्यायांमध्ये जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे बालसंरक्षण अधिकारी
 दिवेश मराठे यांनी सांगितले.