बुलडाण्यातील ३० जणांचे होणार ड्रायव्हिंग लायसन रद्द!

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्रीय मोटार वाहन सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला १२ डिसेंबरपासून जिल्ह्यात सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापर्यंत १२ दिवसांत जिल्ह्यात ३० जणांचे ड्रायव्हिंग लायसन रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा वाहतूक शाखेने आरटीओ कार्यालयाला पाठवला आहे. याशिवाय त्यांच्याकडून दंडाची मोठी रक्कम सुद्धा वसूल करण्यात आली आहे. सुधारित वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकीवर ट्रिपल सीट बसून जात असल्यास एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांकरिता परवाना सुद्धा रद्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेने दिली.

१२ डिसेंबरपासून नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून जिल्ह्यात २ हजार तीनशे २४ जणांकडून १९ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात पोलिसांनी इशारा देऊनही न थांबणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, हेल्मेट न वापरणे, नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे करणे, सीटबेल्ट न लावणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे या कारणामुळे पोलिसांनी दंड वसूल करण्यात आला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्हा वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्यांकडून तब्बल ३ कोटी ८३ लाख ६६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

दंड वाढला तरी मानसिकता जैसे थे...
केंद्रीय मोटार वाहन कायद्यात सुधारणा करत वाहतूक नियमांचे पालन व्हावे. कोणीही त्याचा भंग करू नये यासाठी दंडाच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली. तरीही वाहनधारकांची मानसिकता जैसे थे असल्याचे चित्र आहे. मात्र आता अशांना वाहतूक शाखनेही वठणीवर आणण्याचा चंग बांधला असून, नियम मोडणाऱ्यांना मोठाच फटका बसू शकतो.