१६ वर्षीय मुलीला शाळेच्या गेटवरूनच पळवले; खामगाव तालुक्यातील घटना

 
जिल्ह्यातून महिनाभरात ११ अल्पवयीन मुलींचे अपहरण; आजही शेगावमधील १५ वर्षीय मुलगी गायब!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय मुलीला फुस लावून तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने काल, ७ जानेवारी रोजी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून लखन रामेश्वर इंगळे (२२, रा. हिवरा खुर्द, ता. खामगाव) याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हिवरा खुर्द येथील १० वीत शिकणारी मुलगी ४ जानेवारीला सकाळी साडेनऊला शाळेत जाते म्हणून बोरजवळा येथे गेली होती. मात्र संध्याकाळी घरी न परतल्याने तिच्या आईने मुलीच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती शाळेत आलीच नव्हती. शाळेच्या गेटजवळ आम्हाला दिसली होती.

मात्र वर्गात आली नसल्याचे मैत्रिणींनी सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई- वडिलांनी सर्वत्र शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. याआधी गावातीलच लखन रामेश्वर इंगळे हा तरुण मुलीशी जवळीक साधत असल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले होते. तेव्हा लखनची समजूत सुद्धा काढण्यात आली होती. लखन यानेच मुलीला फूस लावून पळवून नेले, असा संशय असल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी लखनविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपास पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतिश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर हिवाळे करीत आहेत.