


देऊळगावराजातून सिंदखेडराजाच्या १६ वर्षीय मुलीला पळवले; डॉक्टर बनण्यासाठी वडिलांनी लावून दिला होता क्लास; बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणतात हा "लव्ह जिहाद" चा प्रकार!
मुलीच्या वडिलांनी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १६ वर्षीय मुलगी काल,१४ जून रोजी तिच्या मैत्रिणींसोबत देऊळगावराजा येथे परम क्लासेस सासाठी गेली होती. दररोज दुपारी दीड पर्यंत ती परत येते मात्र घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजून गेला तरी ती परतली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. त्यावेळी मैत्रिणीच्या फोनवरून तुमच्या मुलीने कुणालातरी फोन केला आणि माझे काका मला घ्यायला येणार आहेत असे तिने आम्हाला सांगितले त्यामुळे आम्ही सिंदखेडराजा येथे परत आलो असे तिच्या मैत्रिणींनी मुलीच्या वडिलांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी तातडीने देऊळगाव राजा बसस्थानक गाठून मुलीचा शोध घेतला मात्र मुलगी मिळून आली नाही. अंगात मेहंदी रंगाचा टॉप, काळ्या रंगाची असून लॉगिज,५ फूट उंची, गोरा रंग ,चेहरा गोल , हातात काळ्या रंगाची घड्याळ अशा वर्णनाच्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली.
हा "लव्ह जिहाद" चा प्रकार..
दरम्यान या घटनेची चर्चा होताच विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा "लव्ह जिहाद" चा प्रकार असल्याचे बजरंग दलाचे सूरज हनुमंते यांचे म्हणणे आहे. मुलीचे अपहरण करणारा आरोपी हा मुलीच्या घराजवळच राहणारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी २४ तासांत मुलीचा शोध घेऊन आरोपीला अटक करावी अशी मागणीही बजरंग दलाने केली आहे.