शेततळ्यात १५ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! मेहकर तालुक्यातील धक्कादायक घटना

 
hjk
मेहकर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   कालपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृतदेह आज, ३ मे रोजी एका शेततळ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेहकर तालुक्यातील जामगाव शिवारातील शेततळ्यात हा मृतदेह आढळला. साहिल भागवत वायाळ( १५, रा. महादेव वेटाळ, मेहकर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल काल, २ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून गायब होता. शाळेत जातो असे सांगून तो घरून गेला मात्र संध्याकाळपर्यंत तो घरी परतला नव्हता. त्यामुळे मेहकर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती. साहिल चे कुटुंबीय काल रात्रीपासून त्याचा शोध घेत होते. दरम्यान आज जामगाव शिवारातील डॉ .खरात यांच्या शेतातील शेततळ्यात साहिलचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मेहकर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहिल काल, त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला असावा आणि त्यातच त्याचा पोहतांना बुडून मृत्यू झाला असावा असे सांगण्यात येत आहे.