१३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचाराने जवळा पळसखेड हादरले!; २१ वर्षीय तरुणाचे घाणेरडे कृत्‍य!!; शेगाव तालुक्‍यातील घटना

 
rape
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३ वर्षांची असतानाच तिची आई तिला सोडून गेली. वडिलांच्या अंगाखांद्यावरच ती मोठी झाली. मोठा भाऊ आणि वडिलांच्या स्वयंपाकाची जबाबदारी तीच सांभाळते. वडील अल्पभूधारक शेतकरी. शेती आणि मजुरीच्या भरवशावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. तिच्या गरिब परिस्थितीचा आणि असहायतेचा फायदा गावातीलच एका तरुणाने उचलला. गेल्या महिन्यात त्याने घरात शिरून मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या वडिलांना माहीत होऊनही बदनामीच्या भीतीपोटी तक्रार दिली नाही. त्यामुळे काल, १४ जानेवारीला दुपारी त्‍याने पुन्हा मुलीला वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र यावेळी तिने जोरदार प्रतिकार केला. तिची आरडाओरड आणि विरोध पाहून तरुणाने पळ काढला. अखेर आज, १५ जानेवारीला शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तासाभरात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.


मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ डिसेंबर २०२१ रोजी ते शेतात तर त्यांचा नवव्या वर्गात शिकणारा मुलगा शाळेत गेला होता. १३ वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. दुपारी एकच्या सुमारास गावातीलच गजानन ज्ञानदेव कळसकार (२१) तिच्या घरात शिरला. त्‍याने तिच्यासोबत जबरदस्ती संभोग केला. घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र तिला वेदना होत असल्याने वडिलांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने घडला प्रकार सांगितला.

मात्र बदनामी होईल या भीतीपोटी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार न देता आरोपीला केवळ समजावून सांगितले. मात्र तरीही गजाननच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. मुलगी घरी एकटी सापडण्याची संधी तो शोधत होता. काल, १४ जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास मुलगी एकटीच असताना गजानन घरात शिरला. त्याने वाईट उद्देशाने मिठीत ओढून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार केला.

आरडाओरड केली. त्‍यामुळे घाबरून गजानने पळ काढला. वडील शेतातून आल्यानंतर तिने घडलेली हकीकत सांगितली. त्‍यामुळे आज पीडितेला घेऊन तिच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. तक्रारीनंतर गजाननविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने त्याला अटक करण्यासाठी जवळा पळसखेड गाठले. मात्र तक्रारीची कुणकुण लागताच त्याने पसार होण्याचा प्रयत्न केला. वारी हनुमानकडे जात असताना मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला संध्याकाळी पाचच्या सुमारास ताब्यात घेतले. सध्या पीडिता आणि आरोपी गजाननची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. तपास शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश डाबेराव करत आहेत.