पोराला नोकरी लावून द्यायचे १२ लाख दिले; लबाडावर विश्वास ठेवला अन् फसगत झाली! खामगाच्या संजय लांडगेंची स्टोरी वाचा अन् सावध व्हा..!

 
gjk

खामगाव(भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) नोकरीचे आमिष दाखवून फसवणूकीच्या घटना घडल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत उजेडात आली आहेत. अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन वारंवार पोलिसांकडून केले जाते,मात्र तरीही काही जण मात्र ऐकत नाहीत..आणि त्यामुळे त्यांचीही तशीच फसवणूक होते. खामगावच्या एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून तब्बल १२ लाखांनी गंडा घालण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आधी आमिषाला बळी पडून  फसवणूक झालेल्या या तरुणाच्या वडिलांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.

खामगावच्या गजानन नगरात राहणाऱ्या संजय शंकर लांडगे (६३) यांच्या मुलाला नोकरी लावून देतो असे आमिष यशोदानगरात राहणाऱ्या राजेश सीताराम झिने याने दिले. त्यासाठी झिने याने लांडगे यांच्याकडून २०१८ ते २०२१ या काळात दोनदा ६ - ६ लाख असे एकूण १२ लाख रुपये घेतले. तुमच्या मुलाच्या नोकरीचे आज पाहतो, उद्या पाहतो..महिन्याने दोन होईल असे झिने लांडगे यांना सांगत होता. मात्र ४ वर्ष उलटून झिने याने नोकरीला लावले नाही. त्यामुळे लांडगे यांनी झिने याला पैसे परत मागितले. झिने याने आधी टाळाटाळ केली नंतर ३ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र बँकेत गेल्यावर झीने च्या खात्यात पैसेच नसल्याचे समोर आले. अखेर फसवणूक झाल्याची १०० टक्के खात्री झाल्यानंतर लांडगे यांनी झिने च्या विरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या राजेश झिने विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.