१० हजार बुलडाणेकरांनी दिला वाहतूक नियमाला फाटा!

मग पोलिसांनी दिला दट्टा!; १५ दिवसांत ५ लाखांचा दंड वसूल!!
 
वाहतूक पोलीस

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या सुचनेनुसार सर्व पोलीस ठाणी आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने मोटार वाहन कायद्याअंतर्गत 3 ते 18 नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहीम राबविली. यात वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश आवाजाचे सायलेन्सर चालविणारी वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेत एकूण 10 हजार 84 केसेस करण्यात आल्या, तर 15 लाख 79 हजार रुपये दंड लावण्यात आला. पैकी 5 लक्ष 55 हजार 800 रुपये दंडाची वसूली करण्यात आली.

अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव) व अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान फॅन्सी नंबर प्लेट जागीच उतरून बदलविण्यात आल्या. विना नंबरची वाहने पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली. वाहनांवर केलेल्या केसेस संदर्भात त्यांना प्राप्त एसएमएसनुसार तात्काळ दंड जवळच्या वाहतूक अंमलदार यांच्याकडे जाऊन भरणा करण्यात यावा अथवा पाठविण्यात आलेल्या एसएमएसमध्ये ऑनलाईन पैसे भरण्या संदर्भात जी लिंक पुरविण्यात आलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून ऑनलाईन पैसे वाहन धारक भरू शकतो. सर्व वाहन धारकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

केसेस अन्‌ लावलेला दंड...
फॅन्सी नंबर प्लेटसाठी 108 केसेस व लावलेला दंड 1,08,000 रुपये, कर्कश हॉर्न व सायलेन्सर 10 केसेस व दंड 10 हजार, अवैध प्रवासी वाहतुकीसाठी 54 केसेस, ट्रिपल सिटकरिता 735 केसेस व दंड 1,47,000 रुपये, विना लायसन्स वाहन चालविणे केसेस 3455 व दंड 6,91,000 रुपये, नो पार्किंग क्षेत्रात वाहन पार्क करणे केसेस 1519 व दंड 3,03,800 रुपये, विना सिटबेल्ट वाहन चालविणे केसेस 728 व दंड 1,45,600 रुपये, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे केसेस 233 व दंड 46600 रुपये, मोवाका अंतर्गत इतर केसेस 3242 व दंड 1,27,000 रुपये. अशाप्रकारे एकूण केसेस 10084 व लावलेला दंड 15,79,000 रुपये आहे.