खळबळजनक; देऊळगाव मही, चिखलीत महिलेच्या बदनामीचे बॅनर झळकले! महिलेची दोन्ही पोलीस ठाण्यात धाव, दोन वेगवेगळ्या तक्रारी! जिल्ह्यातल्या एका "स्वामी" वर संशय..!

 
देऊळगाव
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली आणि देऊळगावराजा तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 'रूप एक किरदार अनेक' अश्या आशयाचे फोटोसह बॅनर लावून बदनामी केल्याची तक्रार एका ३७ वर्षीय अविवाहित महिलेने देऊळगाव राजा व चिखली पोलिसांत दिली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एका "स्वामी" वर महिलेला संशय असल्याचा उल्लेख तिने तक्रारीत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील ३७ वर्षीय अविवाहित महीलेला शेतात काम करत असताना काल, १५ मे रोजी गावातीलच एका व्यक्तीचा फोन त्यांना आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की तुमचे, चिखली बसस्थानक परिसरात 'रूप एक किरदार अनेक अश्या आशयाचे फोटोसह ' बॅनर लागले आहेत. त्यांनतर भावासह पिडीत महिलेने चिखली बस स्थानक गाठले असता यावेळी बॅनर पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली की, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बदनामी करण्यासाठी हे बॅनर लावले आहे. यावरून अज्ञातावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
        
देऊळगाव राजा ठाण्यात दिलेल्या तक्रारीत "स्वामी"वर संशय...
 याआधी देखील देऊळगाव मही येथील दीग्रस चौकात या प्रकारचे बॅनर लागल्याचे दिसले होते. प्रकरणी पीडित महिलेने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवार, १४ मे रोजी शेतात काम असताना त्यांचे काकांचा फोन आला होता. 'तु आमची इज्जत का घालवती आहे' असे म्हणत त्यांनी सांगितले की, देऊळगाव मही येथील दिग्रस चौकात महिलेचे फोटोसह फलक लावण्यात आले आहे. त्यामध्ये फोटोखाली ' रूप एक किरदार अनेक' असे लिहिले आहे. त्यांनतर महिलेने स्वतः जावून पाहिले असता त्यांची खात्री झाली. महिलेची तब्येत नेहमी खराब असल्याने रानअंत्री येथे स्वामी दयानंद महाराज यांच्या दर्शनाने आराम पडतो म्हणून त्या तिथे गेल्या होत्या. त्यावेळी स्वामी दयानंद महाराज यांनी महिलेचे साडीवर व वेगवेगळ्या ड्रेसवर फोटो काढले होते. तेच फोटो पोस्टरवर लावले असल्यामुळे त्यांनीच बदनामी केल्याची शंका महिलेने तक्रारीद्वारे व्यक्त केली आहे.