धक्कादायक! आधी विनयभंगाची तक्रार केली; नंतर गुन्हा मागे घेण्यासाठी मागितले पैसे! तरुणाने पैसे द्यायला नकार दिल्याने "त्या" तिघींनी तरुणाला उंदीर मारण्याचे औषध पाजले!

तरुणाचा मृत्यू! खामगाव तालुक्यातील घटना..
 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी केल्यावर पैसे न दिल्याने चौघांने एका युवकाला जबरदस्तीने उंदीर मारण्याचे औषध खाऊ घातल्याची खळबळजनक घटना खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे ९ ऑगस्ट रोजी घडली. सदर युवकास तातडीने उपचारासाठी अकोला येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान सदर युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरुन हिवरखेड पोलिसांनी ९ ऑगस्टच्या रात्री दोन युवात, एक महिला आणि एका युवकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता सदर युवकाचा मृत्यू झाल्याने याप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये लाखनवाडा येथील प्रदीप प्रकाश वानखडे (वय २५) या युवकाच्या विरोधात दाखल असलेल्या विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी पैशांची मागणी करीत दोन युवती, एक महिला आणि एक युवक असे चौघेजण ७ ओगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता त्याच्या घरी आले. युवकाने गुन्हा मागे घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी रागाच्या भरात संगनमत करुन जबरदस्तीने उंदीर मारण्याचे औषध युवकाच्या तोंडात टाकले. या प्रकारानंतर युवकाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने युवकाला तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी ९ ऑगस्टच्या रात्री रुग्णालयात पोहचून अत्यवस्थ अवस्थेत असलेलय युवकाचा जबाब घेतला. 
 त्याच्या तोंडी जबाबावरुन रात्रीच गौरव संतोष धानसाडे या युवकासह दोन युवती आणि एका महिलेविरोधात भादंवी कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तर १० ऑगस्ट रोजी सकाळी प्रदीप वानखडे याचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.