अखेर शेतकऱ्यांना फसविणारा व्यापारी आशिष ढवळेच्या माणसावर गुन्हा दाखल! हातात बंदूक घेऊन डिजेच्या तालावर नाचत होता; "बुलडाणा लाइव्ह" ने प्रसिद्ध केला होता व्हिडिओ
Apr 28, 2023, 10:10 IST
जानेफळ (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव साकर्शा येथील फसवा व्यापारी ढवळे याचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली सोयाबीन व्यापाऱ्यांना विकल्यानंतर ढवळे त्याच्या माणसांसह डिजे लावून नाचायचा. त्यात त्याचा माणूस संजय बलासे (२७) हा हातात बंदूक घेऊन नाचत होता, तसा व्हिडिओ "बुलडाणा लाइव्ह"च्या हाती लागल्यानंतर तो प्रसिद्ध करण्यात आला होता. अखेर आता हातात बंदूक घेऊन नाचत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजय बलासे विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, जानेफळ पोलिसांनी तसे वृत्त प्रसिद्धीस दिले आहे.
संजय बलासे सध्या फरार आहे. त्यामुळे त्याच्या हातात बंदुकीसारखे दिसणारे शस्त्र नेमके कोणते होते? देशी कट्टा होता की अन्य दुसरे घातक शस्त्र हे समोर येऊ शकले नाही. आरोपीला पकडल्यानंतर त्याच्या चौकशीअंती ते समोर येईल. १६ जानेवारीला फसवा व्यापारी आशिष ढवळेचा वाढदिवस होता, त्या दिवशीचा तो व्हिडिओ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पुढील तपास ठाणेदार प्रविण मानकर याच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रल्हाद टकले करीत आहेत.