मेहकर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ट्रक-कारचा अपघात!
May 21, 2024, 10:50 IST
मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गावर सेंट्रल बँक जवळ २० मे २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या अपघातात नेक्सॉन कारचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.
सदरचा एमएच २६-बीई ७२७२ क्रमांकाचा ट्रक दुसरबीडकडे जात होता तर जीए ०८०एए ३११९ क्रमांकाची नेक्सॉन कार बुलढाणा येथून नांदेडकडे जात होती. दरम्यान येथील सेंट्रल बँक नजीक सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान हा अपघात झाला. त्यामुळे या भागात काही काळ रहदारी ठप्प झाली होती. जड वाहतुकीस शहरातून मज्जाव असताना सुद्धा अनेकदा जड वाहने शहरातून घुसविले जातात. त्यातच आत्यंतिक गरज असताना सुद्धा रोड दुभाजक नसल्याने शहरात असे अपघात घडतात. दुभाजकाच्या अभावामुळे काही महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसल्या गेले तर काहींनी आपला पोटचा गोळा गमवावा लागला. या अपघातामुळे पुन्हा एकदा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दुभाजकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.