अंगावरची हळदही सुकली नसताना तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू! सुनगावात शोककळा..
May 23, 2024, 09:40 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना काल २१ मे रोजी वरवट बकाल येथे घडली. मृतक तरुणाचा विवाह होवून अवघे १६ दिवस झाले होते, या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुनगाव येथील रहिवासी संदीप शेषराव तेटू (३० वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. त्यांचा विवाह गावातीलच तरुणीसोबत ५ मे रोजी झाला होता. संदीप हा नेहमीप्रमाणे वरवट बकाल येथील बसस्थानकावरील त्याचे कलरचे दुकान उघडून काम करत होता. दरम्यान, दुपारचे जेवण झाल्यानंतर त्याला दुकानातच सर्प दंश झाला. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला एका खाजगी दवाखान्यात नेले. त्यांनतर उपचारानंतर परत घरी आणले. परंतु थोड्यावेळाने त्याची तब्येत खालावली. त्यामुळे त्याला तातडीने शेगाव येथे उपचारासाठी हलविले, मात्र वाटतच त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा सुनगाव येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.