तुम्ही फक्त विना मास्कचे घराबाहेर पडा; ५०० ची नोट गेलीच म्हणून समजा!; बुलडाण्यात तहसीलदार रस्त्यावर

 
file photo

बुलडाणा : विनामास्क फिरणाऱ्यांवर पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. आज, ८ जानेवारी रोजी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार रुपेश खंडारे, नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, बुलडाणा शहराचे प्रभारी ठाणेदार गिरीश ताथोड रस्त्यावर उतरलेले दिसले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णाची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. याआधी दोन ओमिक्रॉनचे रुग्ण सुद्धा बुलडाण्यात आढळले होते. आज, ८ जानेवारी रोजी ४२ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णाची संख्या सुद्धा शंभरपार गेली आहे. असे असले तरी लोकांमध्ये मात्र कोणतेही गांभीर्य दिसत नाही. विनामास्क फिरण्याची संख्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पोलीस ठाणे, कारंजा चौक, जयस्तंभ चौक परिसरात तहसीलदार रुपेश खंडारे यांनी विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. आज ८ जानेवारी रोजी दुपारपर्यंत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता.

कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. कोरोनाचा वाईट काळ आपण बघितला आहे. तरीही काही जण विनामास्क फिरतात. त्यांच्यावर यापुढे आता कठोर कारवाई करण्यात येणार आहेत. दंडात्मक कारवाईसाठी तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन,आणि नगरपालिकेच्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.
- रुपेश खंडारे,तहसीलदार बुलडाणा