"पगारा'साठी इंजेक्‍शन घ्यावेच लागणार!

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकल्यानंतर "केंद्र' कुठे आहे रे भाऊ...
 
 
जिल्हाधिकारी कार्यालय
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) ः कोरोना लसीकरणात जिल्हा खूप पिछाडीवर असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. त्‍यामुळे सक्‍तीची सुरुवात सरकारी कार्यालयांपासून झाली आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अजूनही लसचा एकही डोस घेतला नाही त्यांना या महिन्यापासून पगार द्यायचा नाही, असे आदेश आज, १० नोव्हेंबर रोजी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. त्‍यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केंद्राची शोधाशोध सुरू झाली आहे.
आदेशाच्या कडक अंमलबजावणीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण केवळ ५४ टक्के आहे. राज्यात जिल्ह्याचा लसीकरणाच्या बाबतीत २९ क्रमांक लागतो. देशातील ज्या ३४ जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण संथ आहे, त्यात बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र शासकीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतरच नोव्हेंबर महिन्याचा पगार द्यावा. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना पगार देऊ नये, अशी सूचना जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना मिळाली आहे.