चिखलीकरांना पिण्यासाठी पिवळे पाणी ; धरणात ७५% पाणी साठा असताना आठव्या दिवशी पाणी ते पण अर्धवट... न. प. पाणी पुरवठा विभागाचा मनमानी कारभार.!
सत्ता कुणाची ही असो, कीतीही मोठ्या प्रमाणात जलसाठा असो मात्र चिखलीकरांना पाणी पुरवठा १० व्या दिवशीच होणार हे उघड सत्य आहे असा ठाम विश्वास आता चिखलीकरांना वाटू लागलाय. मागिल काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाने आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचा प्रयत्न केला मात्र आता पाणी पुरवठा होतोय, पिवळ्या रंगाच्या पाण्याचा, आठव्या दिवशी आणि तोही अर्धवटच. त्यामूळे विविध प्रभागात होत असलेला अर्धवट पाणी पुरवठा करणाऱ्या विभागाप्रती चिखलीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाणी सोडणारे वॉलमॅन पाणी सोडताना भेदभाव करतात असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी चिखली नगर पालिकेच्या कुंभकर्णी पाणी पुरवठा विभागाने उन्हाळा लक्षात घेता पाणी पुरवठा करण्याचे बिनचूक नियोजन करून चिखलीकरांना व्यवस्थीत व शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी चिखलीकरांकडून होत आहे.
वॉलमनचा वाढला तोरा...
प्रभाग क्रमांक ५ मधील दलित वस्तीला पाणी देणारा वॉलमनचा तोरा वाढला असुन १० मिनिट शिल्लक पाणी पुरवठा करायचे सांगीतले तरी करीत नाही. उलट नागरिकांना उडवाउवीची उत्तरे देतात. तरी नागरिकांना त्रास देणाऱ्या वॉलमनवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पिवळ्या पाण्यामुळे साथरोग वाढीला..!
दरम्यान सातत्याने पिवळा पाणीपुरवठा होत असल्याने सर्दी,खोकला , ताप या आजारांचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. पहाटे थंडी, दुपारी उन असे वातावरण बदल आणि त्यात अशुद्ध पाणी यामुळे आजार वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.