शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! आता एका एकरात घेता येणार ५० क्विंटल मका उत्पादन! बुलडाण्याचा 'शास्त्रज्ञ' ठरणार कृषीसाठी वरदान !

 
jfjjf

बुलडाणा(गणेश निकम: लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शेती क्षेत्रासाठी पुढील आठवडा आनंदाची बातमी घेऊन येणार अशी चिन्हे आहे. एकरी ५० क्विंटल एवढे बक्कळ उत्पन्न देणाऱ्या मका पिकाचे संशोधित वाणास शासनाची मंजुरात मिळण्याच्या हालचाली सुरू आहे. याला कारण ठरलेत ते बुलडाण्याचे कृषी शास्त्रज्ञ... त्यांच्या संशोधनावर सध्या राज्यातील चार कृषी विद्यापीठे मंथन करीत आहे. भरघोस उत्पन्न देणारे मक्याचे हे संशोधित वाण कृषीसाठी वरदान ठरणार आहे.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. पी.जायभाये बुलडाणा केंद्रात कार्यरत आहे. व्यासंगी शास्त्रज्ञ कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. जायभाये.  कृषी विज्ञान केंद्र व संशोधन केंद्राची धुरा त्यांनी सांभाळली आहे. वेगवेगळे कृषीतील प्रयोग हा त्यांचा आवडता छंद असल्याने डॉ. जायभाये राज्यातील कृषी अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांनी मक्याचे संशोधित वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. सखोल संशोधनाअंती हे विकसित वाण त्यांनी मान्यतेसाठी सादर केले. संशोधित वाण शेतकऱ्यांसाठी देखील वरदान ठरणार आहे. यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला असून शासकीय सोपस्कार काय ते बाकी आहे. हे सोपस्कार पार पाडल्यानंतर हे वाण शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

एकरी १५ ते ३० क्विंटल मिळतो मक्याचा उतारा

मका पिकाचा उतारा साधारणतः १५ ते ३० क्विंटलच्या आसपास मिळतो. काही ठिकाणी हवामान व मशागत यावरही तो कमी अधिक ठरू शकतो. मात्र संशोधित वानाचा उतारा चक्क ५० क्विंटलच्या आसपास राहणार, अशी माहिती आहे. एवढे भरघोस उत्पन्न मिळाल्यास बळीराजासाठी ही जमेची बाब ठरणार आहे.

संशोधन क्षेत्रात बुलढाण्याच्या संशोधनाची पडणार भर

शासकीय सोपस्कार व कृषी विद्यापीठाच्या विचाराधीन ही बाब असल्याने अधिकारी वर्गाने यावर  बोलणे टाळले. मात्र राज्यातील विद्यापीठांची एकत्रित बैठक होणे एवढाच काय तो सोपस्कर बाकी असल्याचे वरिष्ठ सूत्राने सांगितले. हे वाण मिळाल्यास ते कृषीसाठी वरदान ठरणार आहे. शिवाय संशोधनाच्या क्षेत्रात बुलढाण्याच्या संशोधनाची भर पडणार असल्याने जिल्ह्यासाठी ही बाब निश्चितच गौरवाची आहे.