शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! पीक कर्ज मिळविण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितली महत्वाची बाब

 

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरीप हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पीककर्जाचे अत्यल्प वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज मिळविण्यासाठी पीक कर्जाचे नुतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. यात यावर्षी पीक कर्ज वाटपाची गती नगण्य असून १ हजार ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्यापपर्यंत २४४ कोटी वितरीत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून केंद्र आणि राज्य शासनाच्या व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. ३० जून पूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याज लागते. तसेच १० टक्के वाढीव कर्ज मिळत असल्याने या योजनेचा लाभ घ्यावा. पीक कर्ज नुतनीकरणामुळे खरीप पिकासाठी लागणाऱ्या खर्चास मदत होते. पीक कर्जाच्या नुतनीकरणासाठी प्रत्येक बँक शाखेमध्ये विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. नुतनीकरणासाठी सात बारा, आठ अ, आधार कार्ड, रेव्हेन्यू स्टॅम्प आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. पीक कर्जाचे नूतनीकरण शेतकऱ्यांना फायद्याचे असल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज नूतनीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.