कामाची बातमी! हवामान विभागाने पुन्हा दिला धोक्याचा इशारा; पुढचे ५ दिवस पुन्हा अवकाळीची शक्यता;आज आणि उद्या गारपीट होणार! शेतकऱ्यांना दिलेला महत्वाचा सल्ला वाचा.. ​​​​​​​

 
ddh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या एप्रिल सुरू असला तरी सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असल्याने नेमका ऋतू कोणता असा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात सातत्याने ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. नुकसानी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. जीवितहानी देखील झाली. आता तरी अवकाळी पाऊस थांबेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून असताना पुन्हा हवामान विभागाने धोक्याची सूचना दिली आहे. आज,२५ एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील ५ दिवस पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 

आज व उद्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.  तसेच आजपासून २९ एप्रिल पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. आज २५ आणि उद्या २६ एप्रिल रोजी बहुतांश ठिकाणी, २७ एप्रिल ला काही ठिकाणी तर २८ व २९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
शेतकऱ्यांना दिलाय हा सल्ला..!

वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची, गारपीटीची  शक्यता पाहता शेतकरी बंधूंनी पिकांतील, फळबागांतील व भाजीपाला पिकांतील फवारणी व ओलीताची कामे येत्या तीन दिवसांपर्यंत पुढे ढकलावीत.वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीटीची शक्यता असल्याने कापणी केलेला शेतमाल, भाजीपाला व तोडणी केलेली फळे ताबडतोब सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत.जनावरांना उघड्यावर चरायला जाऊ न देता, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था गोठ्यातच करावी.विजांबाबत अचुक पुर्वसुचना प्राप्त होण्यासाठी व जिवीतहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी 
दामिनी मोबाईल ॲपचा  वापर करावा.