बचतगटाच्या महिलांना अश्रू अनावर! जयश्रीताई शेळकेही गहिवरल्या! जिल्हास्तरीय प्रदर्शनीच्या समारोपात दिसून आले भावुक दृश्य

 
jdie

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या वतीने येथे आयोजित जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनी 'इन्व्हेंट मॅनेजमेंट' चे उत्तम उदाहरण ठरले. यावर भावनिक ठरलेल्या समारोपाने कळस चढविला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना महिलांना अश्रू अनावर झाले. यामुळे एरवी खंबीरपणे वागणाऱ्या दिशा फेडरेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई शेळके भावनिक झाल्या व त्यांचेही डोळे पाणावल्याचे दिसून आले.

शासकीय बीएड कॉलेजच्या भव्य मैदानावर ४ ते ५  नोव्हेंबर दरम्यान ही सर्वार्थाने भव्य ठरलेली प्रदर्शनी पार पडली. या प्रदर्शनीत जिल्ह्यातील तब्बल १४० बचतगटांनी स्टॉल लावले होते. यात स्वनिर्मित वस्तू, विविध खाद्यान्न, वस्त्रे, यांचा समावेश होता. त्यांची सर्व प्रकारची व्यवस्था दिशा फेडरेशनने केली होती. संवेदनशील मनाच्या जयश्रीताईंची स्वतः त्यावर करडी नजर होती. दूरवरून आलेल्या या महिलांना कोणतीही कमी पडायला नको, असे त्यांनी आयोजन समितीला बजावले होते. त्यामुळे दोन दिवस बचत गटाच्या हजारो महिला हसतखेळत, बागडत प्रदर्शनित सहभागी झाल्या. त्यांना मिळणाऱ्या सन्मानाने भारावून गेल्या. 

समारोपीय कार्यक्रमाला राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, प्रा. रामचंद्र कानडजे, वनिताताई देशमुख, डॉ. माधवी जवरे,अभिता कंपनीचे सीईओ सुनिल शेळके, अर्चनाताई शेळके, रजनीताई शेळके, मोताळा पं. स. माजी उपसभापती रावसाहेब देशमुख, विष्णू फेपाळे आदींची उपस्थिती होती. 

डोळ्यांच्या कडा पाणावल्या

समारोपीय कार्यक्रमात सर्व स्टॉलधारक महिलांचा जयश्रीताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पल्लवी चिखले, अश्विनी सोनुने, सुनिता निकम, अफसानाबी, ऋतिका बावस्कर या महिलांना आपले मनोगत व्यक्त करताना अक्षरशः रडू कोसळले. अडचणीच्या कठीण काळामध्ये दिशा बचतगट फेडरेशन आणि जयश्रीताई शेळके यांनी मोठा आधार दिल्यामुळे आपण त्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकलो हे महिलांनी भावुक होऊन सांगितले. यावेळी जयश्रीताईंना देखील अश्रू अनावर झाले. यामुळे दिशा फेडरेशनच्या बचत गटातील महिला एका परिवारासारख्या राहतात, त्यांचे प्रेम किती अतूट आहे हे सिद्ध झाले. यामुळे कार्यक्रमाला उपस्थितांचे डोळे देखील पाणावल्याचे अदभुत चित्र पहावयास मिळाले. प्रदर्शनात सहभागी सर्व महिला उद्योजक आणि कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे जयश्रीताईंनी आभार मानले. समारोपातील हे अविस्मरणीय भावुक क्षण हृदयात साठवूनच महिलांनी सर्वांचा निरोप घेतला.


जयश्रीताईंचे कार्य प्रेरणादायी - सदानंद देशमुख

समाजाला नवे काही देण्यासाठी समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा शोध लेखक घेत असतात. त्यामधून नवा विचार देण्याचे कार्य लेखकाला करायचे असते. दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी किती महिलांना प्रेरणा दिली याचा वस्तुपाठ आपल्याला दोन दिवसीय बचतगट प्रदर्शनीच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून जिल्ह्यातच नाही तर देशपातळीवर याचा आदर्श घेतला जाईल, असे गौरवोद्गार प्रसिद्ध साहित्यिक बारोमासकार  प्रा. सदानंद देशमुख यांनी काढले.