Amazon Ad

महिला सरपंचाच्या आत्मदहन इशाऱ्याने धास्तावले प्रशासन ; एक जूनपर्यंत करणार रेती घाटाची तांत्रिक मोजणी! अवैध रेती उत्खनना विरोधात दिला होता इशारा..

 
सिंदखेड राजा(बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथे शासकीय रेती घाटातून लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन सुरू होते. सदर उत्खननाचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नसल्याने महिला सरपंचा शिला चाटे यांनी रेती घाटाची तांत्रिक मोजणी करण्याची मागणी केली व आत्मदहनाचा इशारा देखील दिला. या इशाऱ्याने महसूल प्रशासन चांगलेच धास्तावून गेल्याचे दिसत आहे. १ जून पर्यंत रेती घाटाचे तांत्रिक मोजमाप करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. त्यामुळे सरपंचा चाटे यांनी आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित केले. 
 रेतीमाफीयांच्या कारस्थानामुळे निमगाव वायाळ परिसरातील नागरिक हैराण झाले होते. शासकीय रेती घाटातून लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन जोमात सुरू होते. रेतीमाफीयांची वाढती मुजोरी शासणासाठी देखील धोक्याची ठरत असल्याचे बोलल्या गेले. महसूल विभाग अवैध रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत नाही असा सुद्धा आरोप मध्यंतरी करण्यात आला. दरम्यान, २७ मे रोजी महिला सरपंचा शीला चाटे यांनी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना याबाबतचे निवेदन सादर करून आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानंतर सदर रेती घाटाचे १ जून पर्यंत तांत्रिक मोजमाप होणार असल्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. नायब तहसीलदार संदीप बंगाळे, मंडळ अधिकारी मस्के, तलाठी यशवंत घरजाळे, विष्णू थोरात, राहुल देशमुख, आकाश मघाडे कोतवाल यांच्या उपस्थितीत सरपंचा चाटे यांचे आत्मदहन स्थगित करण्यात आले. 
खडकपूर्णा नदीच्या आवारात पोलिसांचा बंदोबस्त! 
 आत्मदहन या गंभीर आंदोलनाची दाखल घेवून प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. परंतु, नदीपात्रात व परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.