बुलडाण्यात हिवसाळा!; आज धो धो कोसळला!!, पुढील ३ दिवस पावसाचे

 
rain
बुलडाणा : गेल्या काही दिवसांत थंडीचा बोचरेपणा वाढलेला असताना आता पुन्हा थंडी कमी होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात २८, २९, ३० डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तिन्ही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने शेतातील पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
बुलडाणा शहरात आज, २८ डिसेंबर रोजी दुपारीच हवामान विभागाने दर्शविलेला अंदाज खरा ठरला. दुपारी सव्वा दोनपासून धो धो पावसाला सुरुवात झाली. काही भागांत गव्हाच्या दाण्याच्या आकाराची गारपीट झाली. जिल्ह्यात पुढील ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी होईल. त्यामुळे उभ्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेला माल तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वीजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.